Dighi: फूस लावून पळवून नेऊन लूटणा-या दोघांना अटक

खंडणी दरोडाविरोधी पथकाची कारवाई; दिघी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज – फूस लावून पळवून नेऊन जबरी चोरी करणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी पथकाने भोसरी येथे केली. या कारवाईमुळे दिघी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

लोकेश वसंत कुळे (वय 25, रा. शीतल बाग, भोसरी), अनिकेत सुभाष कोथींबीरे(वय 24, रा. संत तुकाराम नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 11) दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील फरार आरोपी लोकेश कुळे राजमाता कॉलेज समोरील दुर्गा नाष्टा हाऊसजवळ थांबला असल्याची माहिती पोलीस शिपाई गणेश कोकणे यांना मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचून आरोपी लोकेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे संबंधित गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला खंडणी दरोडाविरोधी पथक, गुन्हे शाखा येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

मंगळवारी (दि. 12) पोलीस शिपाई सुधीर डोळस यांना माहिती मिळाली की, दिघी पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अनिकेत कोथींबीरे प्रियदर्शनी शाळेजवळ दिघी रोड भोसरी येथे थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून अनिकेत याला ताब्यत घेतले. त्यालाही खंडणी दरोडाविरोधी पथक, गुन्हे शाखा येथून आणून कसून चौकशी केली असता त्यानेही फूस लावून पळवून नेऊन जबरी चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

  • ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, महेश खांडे, राजेंद्र शिंदे, नितीन लोखंडे, विक्रांत गायकवाड, निशांत काळे, आशिष बनकर, शरीफ मुलाणी, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.