Pimpri: पाच महिन्यापूर्वी पदावनत झालेल्या शिक्षण अधिका-याला पालिकेने केले कार्यमुक्त

सहायक प्रशासन अधिका-याकडे शिक्षण मंडळाचा अतिरिक्त पदभार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाचे प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांना राज्य सरकारने पाच महिन्यापूर्वी पदावनत केले होते. पिंपरी महापालिकेने तब्बल पाच महिन्यानंतर त्यांना सोमवारी ( दि.21) कार्यमुक्त केले आहे. शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. दरम्यान, पालिकेत आता शिक्षण अधिकारी म्हणून कोण येणार याची उत्सूकता लागली आहे.

महापालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांची बदली झाल्यानंतर या पदावर बी. एस आवारी यांची 1 जून 2016 मध्ये एका वर्षासाठी नेमणूक करण्यात आली होती. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 4 डिसेंबर 2017 मध्ये आवारी यांची पदोन्नती रद्द केली होती. त्यांना पुण्यातील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयात उपशिक्षणाधिकारी (गट ‘ब’) या पदावर पदावनत करण्यात आले. त्यामुळे आवारी यांना महापालिकेतील शिक्षण मंडळ विभागातून कार्यमुक्त करण्यात आले आहे.

शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पराग मुंढे यांच्याकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. याबाबतचा आदेश महापालिका प्रशासनाने काढला आहे. दरम्यान, पालिकेत आता शिक्षण अधिकारी म्हणून कोण येणार याची उत्सूकता लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.