Hari Narke : परखड विचारवंत हरी नरके काळाच्या पडद्याआड

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्यावर विपुल लिखाण करणारे (Hari Narke) प्रसिद्ध लेखक प्राध्यापक हरी नरके यांचे आज (बुधवारी, दि. 9) आकस्मिक निधन झाले ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना त्यांची जन्मभूमी असलेल्या शिरूर तालुक्यावर शोक कळा पसरली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. बुधवारी सकाळी मुंबईला जात असताना सकाळी सहा वाजता त्यांना गाडीत दोन वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता व मुलगी प्रमिती असा परिवार आहे.

ओबीसींच्या प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य, तसेच भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर त्यांनी उल्लेखनीय काम केले. मराठी भाषेला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमलेल्या प्रा. रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी विशेष योगदान दिले.

महाराष्ट्र शासनाचा समग्र महात्मा फुले नावाचा एक हजार पानांचा अद्यावत ग्रंथाचे संपादक म्हणून प्रा. नरके यांनी काम पाहिले. राज्य शासनाच्या (Hari Narke) वतीने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समग्र वाङमयाच्या 26 खंडांपैकी सहा खंडाचे संपादन हरी नरके यांनी केले. ‘महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्य’ संशोधन, आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा ‘ ही त्यांची दोन पुस्तके विशेष लोकप्रिय झाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी हरी नरके यांनी समग्र लिखाण केले.

Gold Rate – आज सोन्याच्या किंमतीमध्ये थोडी घट तर चांदीचा दर 2000 ने कमी 

शिरूर तालुक्यात सांस्कृतिक चळवळ रुजावी यासाठी प्राध्यापक नरके यांनी, आईच्या नावाने ‘सोनाई स्मृती व्याख्यानमाला’ गेल्या दहा ते बारा वर्षापासून सुरू केली होती. दरवर्षी होणाऱ्या या व्याख्यानमालेत राज्यातील अनेक नामवंत विचारवंत साहित्यिकांनी विचार मांडले.

सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या हरी नरके यांच्या आकस्मिक निधनामुळे समस्त पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी झाली अशा भावना मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या.

हरी नरके हे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरेचे रहिवासी असल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आम्हाला मोठा अभिमान होता. शिरूर तालुक्यात सांस्कृतिक चळवळ रुजावी यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न आमच्यासाठी प्रेरणादायी होता. बहुजन समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी आयुष्यभर झटलेलं हे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेल्याने समाजाची मोठी हानी झाली आहे अशी भावनाशील प्रतिक्रिया आमदार अशोक पवार यांनी दिली.

प्रा. नरके यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिरूर तालुक्यातील अनेक जण मुंबईला रवाना (Hari Narke) झाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.