Hari Narke : प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त

एमपीसी न्यूज – महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर ( Hari Narke) विपुल लेखन करणारे, समता चळवळीतील प्रमुख, परखड विचारवंत अशी ओळख असलेले प्रा. हरी नरके यांचे आज (बुधवारी, दि. 9) निधन झाले. मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राच्या विचार – व्यासपीठावर आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांनी प्रा. हरी नरके यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. फुले – शाहू – आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रासह सर्वदूर पोहोचावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा जीवनपरिचय आणि त्यांच्या विषयीचे संशोधनात्मक लेखन यांचा त्यांचा व्यासंग होता.

यातून त्यांनी उत्कृष्ट अशा ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वक्तृत्वाची आगळी शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून रचनात्मक काम केले. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळ आणि राज्यातील अभ्यास – संशोधनात्मक लेखन प्रवाहाची हानी झाली आहे,” असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Subhedar 2023 – ‘ सुभेदार ‘ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा असलेला, ओबीसी हक्कांसाठीच्या चळवळीत आघाडीवर राहून लढणारा कृतिशील कार्यकर्ता आपण गमावला आहे. ते सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक, परखड भाष्यकार होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक, संशोधक, व्याख्याते ही त्यांची ओळख होती.

तत्कालिन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रा. हरी नरके यांनी अनेक शासकीय समित्यांवर तज्ज्ञ सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या निधनानं दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची बाजू हिरिरीने मांडणारे, ओबीसी चळवळीला वाहून घेतलेले बुद्धिवादी व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यानी प्रा. हरी नरके यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले की, “ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्राने महात्मा फुले यांच्या साहित्याचा आणि विचारांचा अभ्यासक गमावला आहे.प्रा. हरी नरके यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून नेहमी महात्मा फुले यांचे विचार मांडले. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे. समता परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. संशोधक म्हणूनही त्यांनी उत्तम कार्य केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी ( Hari Narke) आहोत.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.