Kasarwadi : सिरवी समाजाचा ढूॅंढ उत्सव उत्साहात साजरा

हजारो सिरवी समाजातील नागरिकांची पाहण्यासाठी गर्दी

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो सीरवी क्षत्रिय बांधवांनी फुगेवाडी येथे पारंपारिक पध्दतीने आज (गुरुवारी) ढूंढ उत्सव साजरा केला. पारंपारिक वेशभूषेत पुरुषांनी गेर तर, महिलांनी घुमर नृत्य सादर केले. सिरवी समाजाच्या ढॅूढ उत्सवात यावर्षी वृंदावनातील होळी हे  खास आकर्षण होते. यामध्ये  विविध नृत्याने नागरिकांना पहावयास मिळाली.

होळी सणाला मूळच्या राजस्थानमधील सीरवी क्षत्रिय समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळीच्या दुस-या दिवशी म्हणजेच धुलीवंदनला ढूंढ उत्सव साजरा करण्यात येतो. या आगळ्या-वेगळ्या ढूंढ उत्सवाच्या रिवाजानुसार घरात पहिल्या जन्मलेल्या मुलाचा विशेष धार्मिक विधी करण्याची प्रथा या समाजामध्ये प्रचलित आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 90 हजार सीरवी क्षत्रिय समाजबांधव आहेत. 1992 सालापासून दोन्ही शहरातील बांधव कासारवाडी येथील श्री आई माताजी मंदिरात हा एकत्रितपणे हा उत्सव साजरा करतात. समाजातील एकोपा कायम रहावा हा त्यामागील हेतू आहे.

  • श्री आई माताजी मंदिरात आज सकाळपासूनच सीरवी समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. समाजातील महिला आणि पुरुष पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. पुरुषांनी डोक्‍यावर वेगळ्या पध्दतीची पगडी, अंगामध्ये पांढराशुभ्र सदरा, धोती परिधान केली होती. नृत्य सादर करणाऱ्या पुरुषांनी पायामध्ये घुंगरू बांधले होते. हातामध्ये सुबक छत्री (छंग) घेवून त्यांनी कधी स्वतः भोवती तर कधी वतुर्ळाकार गोलगोल गिरक्‍या घेत गेर नृत्य सादर केले.

पारंपारिक शस्त्रांसह मर्दानी खेळ सादर करण्यात आले. महिलांचीही वेशभूषा आकर्षक होती. पारंपारिक दागिने, हाताच्या कोपरापर्यंतच्या बांगड्या, घागरा आणि चोलीतील त्यांचे रुप खुलून दिसत होते. पायाला गुडघ्यापर्यंत घुंगरु बांधले होते. चेहऱ्यावर घुंगट घेवून त्यांनी घुमर नृत्य सादर केले. त्यांना पारंपारिक वाद्य वादनाची साथ लाभली. थंडाई, जिलेबी, भजीचा आस्वाद घेत ढुंढ महोत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

  • उत्सव पार पडल्यानंतर समाज बांधवांकडून मंदिर परिसराची स्वच्छता करत स्वच्छतेचाही संदेश देण्यात आला. चंदूलाल भायल, लालाराम चोयल, रघुराम काग, उमेश गेहलोत, धगलाराम गेहलोत, शिशराम भायल, सुखाराम काग, पुखराज लचेता, कालूराम पवार, मोहन परिहार, हिरालाल लचेता, हिरालाल पवार, भवरलाल सिद्रा, प्रेमराज चोयल आदींनी संयोजनात पुढाकार घेतला.

असा पार पडला ढुंढ विधी
यावेळी समाजातील बालकांचा ढुंढ विधी करण्यात आला. त्याची प्रथाही गंमतीशीर आहे. धार्मिक विधी पार पडल्यानंतर या बालकांच्या डोक्‍यावर बांधलेल्या आडव्या काठीवर जोरजोरात प्रहार केले जातात. कुटुंबातील हे पहिलेच बालक असल्याने कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची तसेच कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करण्याची ताकद त्याला मिळावी, हा यामागील हेतू असतो. त्याच्या मामालाही धपाटे मारतात. मामाने शेवटपर्यंत भाच्याची काळजी घ्यावी, याची जाणीव त्याला त्याव्दारे करुन दिली जाते. हा सोहळा पार पडल्यानंतर फुलांची उधळण करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.