Khed Crime News : खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात अघोरी कृत्य; वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेला विवस्त्र करून फासला अंगारा

एमपीसी न्यूज – दोन्ही मुली झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून पती आणि सासू या दोघांनी मिळून पत्नीच्या संपूर्ण शरीरावर भोंदूबाबाकडून आणलेला अंगारा आणि हळदी कुंकू फासले. विवाहितेच्या छळाची ही अत्यंत धक्कादायक घटना खालुंब्रे ( ता. खेड ) येथे घडली. अघोरी कृत्य करणाऱ्या पती, सासू आणि भोंदूबाबांच्या विरोधात महाळुंगे पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली आहे.

पीडित महिलेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी पीडित महिलेला दोन मुली झाल्या. या कारणावरून तसेच लग्नामध्ये फिर्यादीच्या आईवडिलांनी मानपान केला नसल्याच्या कारणावरून आरोपींनी पीडित विवाहितेला वेळावेळी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वंशाला दिवा म्हणून मुलगा असावा, असा पती आणि त्याची आई या दोघांचा आग्रह होता. त्यामुळे पीडित महिलेवर ते वारंवार अत्याचार करत होते. हे दोघे कामशेत ( ता. मावळ ) येथील एका भोंदूबाबाकडे पीडित महिलेला घेऊन गेले. भोंदूबाबा समोर पीडित महिलेला बसवल्यावर बाबाने हातातील कवड्या जमिनीवर टाकून तोंडाने मंत्र पुटपुटत हिशेब केल्याचे हातवारे केले. फिर्यादीला मुलगा होण्यासाठी अंगारा खाण्यासाठी दिला. तसेच काही अंगारा कागदामध्ये बांधून दिला.

भोंदूबाबाने सांगितल्यानुसार आरोपी पती व त्याच्या आईने पीडित महिलेला संपूर्ण कपडे उतरविण्यास सांगितले. त्यानंतर पीडित फिर्यादीच्या शरीरावर अंगारा व हळदीकुंकू लावला. आपल्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला घाबरली. त्यामुळे पीडित महिलेने महाळुंगे (ता. खेड) पोलीस चौकीत धाव घेतली. आपल्यासोबत घडलेल्या घटनेबाबत पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम ३ नुसार तसेच विनयभंग केल्याप्रकरणी आरोपींच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.