Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणावर पोलिसांचा लाठीचार्ज

आंदोलकांना आवरण्यासाठी हवेत गोळीबार

एमपीसी न्यूज – जालन्यात मराठा (Maratha Reservation) आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांनी टाकलेल्या मंडपात पोलीस घुसले. यावेळी पोलिसांनी प्रचंड लाठीचार्ज केला.

आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात संबंधित घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. आरक्षण थेट जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती.

Wakad : वेळीच मदत मिळाल्याने वृद्धाचे वाचले प्राण

आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे.

29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाम झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली.

जालन्यात लाठीचार्जच्या घटनेमुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्गावर जाळपोळ केली आहे. आंदोलकांनी काही वाहनांना जाळून टाकलं. तसेच महामार्गावर दगडफेक देखील झाली. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, लाठीचार्जमध्ये काही महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.