चित्रपट “ भाई व्यक्ती की वल्ली [ पूर्वार्ध ] आठवणीतील साठवण

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु, ल. देशपांडे अर्थात भाई त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू रसिकांना माहित आहेत, विनोदी कथा लेखन, नाटक, सिनेमा, प्रवासवर्णन, एकपात्री प्रयोग, गीत, संगीत अभिनय ह्या सर्वच गुणांनी त्यांनी रसिकांना फक्त आनंद दिला. आजच्या घडीला सुद्धा ते आपल्या मनांत घर करून आहेत. सर्वच रसिकांच्या हृदयात त्यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. आजसुद्धा पु. ल. देशपांडे यांच्या कथांचे, प्रवासवर्णनचे वाचन करून रसिक आनंदित होतो. पु. ल. देशपांडे ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा, “ भाई, व्यक्ती कि वल्ली { पूर्वार्ध ], ह्या चित्रपटात सादर केला आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अश्या दोन भागात निर्मिती होणार आहे.

भाई व्यक्ती कि वल्ली [ पूर्वार्ध ], ची निर्मिती महेश मांजरेकर मुव्हीज ने केली असून प्रस्तुती वायकोम १८ मोशन पिक्चर्स ने केली आहे. दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून छायांकन करण बी रावत, संगीत अजित परब, यांचे आहे. पटकथा गणेश मतकरी संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत, यामध्ये सागर देशमुख, इरावती हर्षे, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, ऋषिकेश जोशी, शुभांगी दामले, जयंत देशपांडे, सतीश आळेकर, स्वानंद किरकिरे, अजय पुरकर, पद्मनाभ बिंड, प्रतिभा भगत, संदीप ठाकूर, असे एकूण सत्तर कलाकारांचा सहभाग आहे. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची मोलाची कामगिरी कोणीच विसरू शकणार नाही.

पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्याचा आवाका इतका मोठा आहे कि पूर्वार्धात, सुरवातीला त्यांचे बालपण, पेटीवादन, वडिलांनी दिलेले प्रोत्साहन, शालेय जीवन, चाळीतल्या मुलांनी केलेले नाटुकले, पासून पुण्यातील वास्तव्य, फर्ग्युसन कॉलेज मधील त्यांचा काळ, त्यांचे सुंदर दिवाडकर बरोबर झालेले पहिले लग्न, आणि नंतर सुनिता ठाकूर यांच्या बरोबर झालेली ओळख,आणि नंतर लग्न, त्याच बरोबर पु ल देशपांडे यांना भेटलेल्या अनेक व्यक्ती त्यामध्ये राम गबाले, ग दि माडगुळकर, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, नाथा कामत, डॉ जब्बार पटेल, कुमार गंधर्व, रावसाहेब, अंतू कर्वे, अश्या अनेक मित्रांच्या बरोबर केलेली कामे ह्याचा मागोवा छान घेतला आहे. पु ल देशपांडे यांना मित्रांच्या संगतीत रमायला आवडायचे, रंगभूमी आणि संगीतावरील त्यांचे प्रेम अश्या अनेक पैलूचे दर्शन आल्हादायक आहे. त्याचवेळी त्यांच्या घरातील कौटुंबिक सुख-दुःखाचे संयमाने दाखवलेले प्रसंग मनाला चटका लावून जातात.

यामध्ये पु ल देशपांडे यांची व्यक्तिरेखा सागर देशमुख यांनी छान रंगवली असून त्यातील बारीक सारीक बारकावे, त्यांच्या लकबी उत्तमपणे साकारलेल्या आहेत. सुनीताबाईची भूमिका इरावती हर्षे यांनी त्या व्यक्तिरेखेच्या विविध छटा सह सादर केली आहे. या शिवाय सचिन खेडेकर, सुनील बर्वे, विद्याधर जोशी, शुभांगी दामले, अजय पुरकर, स्वानंद किरकिरे, पद्मनाभ बिंड, सतीश आळेकर, इत्यादी सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला उत्तमपणे सादर केल आहे. चित्रपटाच्या शेवटची बहारदार मैफल खास आठवणीतील साठवण आहे. एक सुंदर सिनेमा पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.