Sangvi : सासरच्या मंडळींकडून होणा-या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – माहेरवरून वारंवार पैसे आणायला भाग पडून पैसे न आणल्यास शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार जुनी सांगवी येथे घडला असून पती आणि अन्य दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रजेश ठाकूर (वय 35, रा. मु. पो. ढोलबज्जा, ठाणा. फारबिसगंज, जि. अररिया, बिहार) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुमार विभुती भुषण उर्फ नन्हे अरविंदकुमार देव (वय 29, रा. पवार नगर, जुनी सांगवी) आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीषा कुमारी असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा आणि कुमार विभूती यांचा जून 2017 रोजी विवाह झाला. ते दोघे जुनी सांगवी मधील पवार नगर येथे राहत होते. लग्नानंतर सुरुवातीचे दोन महिने सर्वजण मनीषा सोबत चांगले वागले. त्यानंतर कुमार विभूती याने दारू पिऊन दररोज मारहाण करण्यास सुरुवात केली. वारंवार माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. तसेच दुसरे लग्न करायचे आहे, असे सांगून तिचा मानसिक छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून मनीषाने शनिवारी (दि. 23) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. के. आहेर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.