Nigdi : शिवराज्याभिषेक दिन हा देशाला स्वातंत्र्य व सार्वभौमत्व देणारा दिवस – ब. हि. चिंचवडे

शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज  – रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी स्वराज्याची संकल्पना समोर आली. ही संकल्पना पुढे सर्व मावळ्यांची आणि स्वराज्यातल्या प्रत्येक रयतेचे स्वप्न बनली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानातून निर्माण झालेले हे स्वराज्य आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन हा देशाला स्वातंत्र्य सार्वभौमत्व मिळवून देणारा दिवस आहे, असे मत इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे यांनी व्यक्त केले.

प्राधिकरण येथे आयोजित करण्यात आलेल्या हिंदू साम्राज्य स्थापना दिन उत्सवात चिंचवडे बोलत होते. कार्यक्रमासाठी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, शर्मिला बाबर, पांडुरंग वाघ, बाबुराव इंगवले, अशोक मतकर, दामोदर साळुंखे, अनिल पोटे, बाबुराव फडतरे, माणिक फडतरे, सुधीर साबळे, राहुल वलेकर, सुहास पाटील, सुशांत कणसे, श्रीनिवास पाटील, इतिहास अभ्यासक निलेश गावडे, मनोज भालेघरे, प्रशांत लवटे पाटील, शिवाजी निंबाळकर आदी उपस्थित होते.

चिंचवडे म्हणाले, घडलेला इतिहास आणि मांडला जात असलेला इतिहास यामध्ये काही प्रमाणात तफावत आढळते. ही तफावत दूर करत खरा इतिहास लोकांसमोर मांडणे ही आजच्या इतिहास संशोधकांची खरी जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात हेन्री नावाचा एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्याला कोणतेही आमंत्रण पाठविण्यात आले नव्हते. तरीदेखील तो सोहळ्यासाठी रायगडावर उपस्थित होता. त्याने आपल्या डायरीत राज्याभिषेकाचे निष्पक्षपातीपणे वर्णन करून ठेवले आहे. एखादा ति-हाइत माणूस एखाद्या गोष्टीबाबत लिहीत असेल, तर ते लिखाण इतिहासाचा ठोस पुरावा मानला जातो. असे सांगत प्रतापराव गुजरांचा रणसंग्राम आणि इतिहासाचे वेगवेगळे दाखले देत त्यांनी विषय मांडला.

कार्यक्रमाचे आयोजन शिवतीर्थ प्रतिष्ठान आणि संयोजन नगरसेवक अमित गावडे यांनी केले. प्राधिकरणातील सर्व शिवप्रेमी नागरिक, सेवाभावी संघटना व गणेशोत्सव मंडळांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनव युवक मित्र मंडळ चौक (रस्टन कॉलनी) ते शिवतीर्थ चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.