Bhosari : पादचाऱ्याला उडवणारा टेम्पो चालक अटकेत

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात व अविचाराने टेम्पो चालवून रस्त्याने पायी जात असलेल्या पादचाऱ्याला उडविल्याची घटना सोमवारी (दि. 9) पहाटे देहू-मोशी रोडवर मोशी येथे घडली. यातील टेम्पो चालकाला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

दिलीपसिंग तीलकधारी सिंग (वय 35, रा. चंद्रपुरम, बेंगलोर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई रमेश ढवळे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास देहू-मोशी रोडवर गॅलक्सी अपार्टमेंट जवळ रस्त्याने जात असलेल्या एका पादचाऱ्याला भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने उडवले. यामध्ये 30 वर्षीय पादचारी गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. अज्ञात टेम्पो चालकाला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. हे आव्हान स्वीकारत परिसरात पथके तैनात करून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. मुळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.