Maval : बोरवली येथे श्रमदानातून वनराई बंधारा तयार

एमपीसी न्यूज – मावळ (Maval) तालुक्यातील शिरोता वनपरिक्षेत्र येथे वनविभागाच्या वतीने बोरवली गावच्या हद्दीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. शिरोता वनपरिक्षेत्र मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून बंधारा पूर्ण केला.

Talegaon : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे घवघवीत यश

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार, वहाणगाव वनपरिमंडळाचे वनपाल सखाराम बुचडे, वनरक्षक लालासाहेब वाघखपुरे, नवनाथ मिलखे, काजल पाटील, जयश्री गोंदवले, वनकर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या वनराई बंधाऱ्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास लाभ होणार आहे. नाला किंवा ओढा यातील पाणी यांना स्थानिक रित्या मिळणाऱ्या वस्तूंनी अडवून तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची तजवीज छोट्या प्रमाणात करता येते. याचे बांधकाम सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळु, दगड यांच्या सहाय्याने करता येते. याला मोठ्या प्रमाणावर खर्च येत नाही. हा बंधारा वनराई संवर्धनाचे काम करत असल्याने यास वनराई बंधारा म्हटले जाते.

हा वनराई बंधारा पक्षी, जनावरे व जंगली प्राणी यांची तहान भागविण्यासाठी लाख मोलाची मदत करणार आहे. गावकऱ्यांनीही वनराई बंधाऱ्यावर अधिक भर देत पाणी अडवून, पाणी जिरविण्याचे आवाहन वन खात्याकडून करण्यात आले. वनविभागाकडून करण्यात आलेल्या या वनराई बंधाऱ्याचे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष निलेश गराडे यांनी कौतुक केले.

शिरोता वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार म्हणाले, “यावर्षी एल निनोच्या हवामान परिणामामुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. त्याअनुषंगाने भुजल पातळीत वाढ होण्यास वनराई बंधारे पाणी अडविण्याचे व पाणी जमिनीत जिरवण्याचे लाख मोलाचे काम करण्याबरोबर निसर्गचक्रातील महत्त्वाची भूमिका बजावत असते. पाण्याचे महत्त्व हे कोणत्याच परिमाणात मोजता येत नाही. त्याचा उपयोग आणि महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. पाणी अडविले तर भूजल पातळीत वाढ होईल व मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यातही पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.