Maval News : शिरदे गावापासून ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा प्रारंभ ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नाणे मावळातील दुर्गम भागातील शिरदे, उकसान, गोवित्री, करंजगाव या गावांपासून महाराजस्व अभियानाअंतर्गत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमास सुरवात करण्यात आली. नाणे मावळातील शिरदे या गावापासून गुरुवारी (दि.02) या अभियानास सुरूवात झाली. आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष या गावांना भेट देत कामाचा आढावा घेतला. नागरिकांना तात्काळ योजना व सेवांचा लाभ मिळवून द्या, अशी सूचना शेळके यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, तहसीलदार मधुसुदन बर्गे, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, कृषी अधिकारी संताजी जाधव, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी व गावातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच आवश्यक ते शासकीय दाखले मिळविण्यासाठी तालुक्यातील शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तरी देखील कामे वेळेत होत नाहीत. अशा ग्रामीण भागातील गरजू व वंचित नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व सुविधा पोहचविण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला असून, मावळातील प्रत्येक गावात ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाला गुरूवारपासून सुरूवात केली आहे. अभियानाच्या पहिल्या दिवशीच नागरिकांनी या उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या अभियानात शासनाच्या आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, पुरवठा, महसूल, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, विद्युत विभाग, नागरी सुविधा केंद्र, सामाजिक व विशेष सहाय्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, एकात्मिक बालविकास, शिक्षण व परिवहन इत्यादी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना शासनाच्या योजना व सेवा पुरविण्यासाठी उपलब्ध होते.

विशेष म्हणजे नागरिकांना गावातच कोविडची लस तसेच आधार कार्ड, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, एसटीचे पास, रेशनकार्ड, जनावरांची औषधे, इत्यादी अनेक योजनांचा तात्काळ लाभ घेता आला. यावेळी सर्व शासकीय अधिकारी गावातच उपस्थित असल्याने गैरसोय होणार नाही.

आमदार सुनील शेळके यांनी शिरदे, उकसान, गोवित्री, करंजगाव या गावात उपक्रमाला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. नागरीकांची चौकशी केली तसेच, नागरिकांना तात्काळ त्याच ठिकाणी योजना व सेवांचा लाभ मिळवून द्या, अशा सूचना शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.