Maval/Shirur : प्रचाराच्या रणधुमाळीने गाजला प्रचाराचा पहिला रविवार 

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमधील आजचा पहिला रविवार. या सुट्टीच्या दिवसाची पर्वणी साधून महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांनी जास्तीतजास्त मतदारांपर्यंत कसे पोचता येईल यासाठी शर्थ केली. सभा, प्रचारफेऱ्या, मतदारांच्या गाठी भेटी या माध्यमातून रविवारचा दिवस सर्वच उमेदवारांनी सत्कारणी लावला. 
मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज सभांवर भर दिला. मावळ मतदारसंघ हा मोठा मतदार संघ आहे. बारणे यांनी आज रविवारचा मुहुर्त साधत घाटाखाली प्रचार केला. सभा घेत मतदारांना साद घातली. उरण, कर्जत, पनवेल परिसरातील तळोजे, खारघर, कळंबोली, कामोठे या ठिकाणी सभा घेतल्या. तर, पनवेलमधील खांदा कॉलनी, शिवाजी चौक येथे देखील त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
  • मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आजच्या रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सकाळी चिंचवड येथील सेंट फ्रान्सेस येथील चर्च,  देहुरोड येथील दीक्षाभूमीला भेट दिली. तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली.

तळेगाव-दाभाडे एमपीसी व युपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चिंचवड, आहेर गार्डन येथील कामगार मेळाव्याला देखील पार्थ यांनी उपस्थिती लावली.
  • शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज हडपसर परिसरात प्रचार केला. सकाळी ‘मॉर्निंग वॉक विथ मतदारांशी टॉक’ त्यांनी केला. त्यानंतर भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. तर, शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांनी देखील रविवारी हडपसर परिसरातच प्रचार केला. पुणे महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, भाजप पदाधिका-यांच्या आढळराव यांनी भेटी-गाठी घेतल्या.
सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर 
मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटीवर भर देण्यासह उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. फेसबुक, व्हॉट्स-अप, ट्विटर अशा सर्व माध्यमांचा त्यासाठी उपयोग करून घेतला जात आहे. फेसबुकवर स्वतःच्या प्रचारासह विरोधी उमेदवाराला देखील टार्गेट केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.