Manobodh by Priya Shende Part 72 : न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही 

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 72
(Manobodh by Priya Shende Part 72)
न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही 
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही 
महाघोर संसार शत्रू जिणावा 
प्रभाते मनी राम चिंतीत जावा

 

या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 72) रामनामाचा मार्ग किती सोपा आहे, त्यात आर्थिक खर्च काही नाही, हे समजावून सांगितलं आहे.
समर्थ पहिल्या चरणात म्हणताहेत की, “न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही”. रामनाम घेण्यासाठी, त्या मार्गावर जाण्यासाठी आपल्याला काही खर्च नाहीये.  फुकट घ्यायचं नाव.   सहसा जिथे खिशाला तसदी असेल तर माणूस ती गोष्ट करत नाही. इथे रामनामात कसलाच खर्च नाही. पण तरीदेखील माणूस त्याचा कंटाळा करतो.  त्या मार्गाला लागत नाही.  कारण त्याचं महत्त्व त्याला कळत नाही. त्याचं मोल समजत नाही.

 

संत , गुरु, साधक यांनी त्याचं मोल जाणलंय.  ते सगळ्यांना समजावून सांगतात.  पण ते साधारण माणसाच्या लक्षात येत नाही, हेच दुर्दैव आहे.  ज्या मार्गाने जाऊन स्वतः कल्याण होणार आहे आणि त्यासाठी पदरची पुंजी, पैसा, धन काहीही घालवायचं नाहीये, हे माणसाला समजायला पाहिजे.  म्हणून ते सांगतात की, तुम्ही हे रामनाम घ्या. त्यात तुमच्या पदरची कवडी खर्च होणार नाहीये आणि तुमचं कल्याण होणार आहे.

 

पुढे ते म्हणतहेत की, “मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही”.  पैसा तर खर्च होणार नाहीच. पण नाम घ्यायला कष्ट पडत नाहीयेत.  माणसाच्या जीवाला कष्ट नको असतात.  विनासायास सुख हवं असतं.  कोणी आयतं आणून दिलं तर माणूस खूष होतो.  इथे स्वतःच्या कल्याणासाठी काही कष्ट करून घ्यायचे नाहीयेत हो.. तुम्हाला फक्त मुखाने रामनाम उच्चारायचं आहे.  त्याला हो कसले कष्टं?

 

तर जिथे आपल्याला पदरमोड नाही करायची, जे रामनाम घ्यायला जराही कष्ट नाहीयेत आणि ज्याचा महिमा अगाध आहे.  हे सांगून सुद्धा माणूस ते करत नाही, स्वीकारत नाही. याबाबत साधु, सज्जन, साधक यांना खेद आहे. वाईट वाटतं.

 

म्हणूनच ते समजावून सांगत असतात की, बाबारे नुसता संसारात गुरफटून जाऊ नकोस. तर रामनाम घेत जा.  संसाराच्या जोडीला रामनाम घेत राहा.  ते फुकाचं आहे, असं सांगून ते रामनामासाठी माणसांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतात.

 

 

तिसऱ्या चरणात  (Manobodh by Priya Shende Part 72) समर्थ म्हणताहेत की, “महाघोर संसार शत्रू जिणावा”. माणसं नुसतीच संसारात रमतात आणि भगवंताला विसरून जातात, म्हणून समर्थ संसाराला मोठा शत्रू असे म्हणतात.  माणूस जन्माला येताना पण कष्ट सोसत येतो, त्याचा मृत्यू देखील कष्टप्रद, यातनामय असतो.  पण तरी देखील माणूस मान्य करत नाही की संसारात ताप आहे, कष्टं आहेत.

 

 

मला जेवायला विविध प्रकार मिळत आहेत.  कपडे घालतोय छान.  देहासाठी सुखसोयी आहेत. हसतोय, गातोय, नाचतोय, सण समारंभ साजरे करतोय. आमचं छान चाललंय. अशा खोट्या आनंदात तो राहत असतो.  पण त्याला कळत नाही की, एखादी आपदा किंवा संकट येतं, तर त्यातून तारुन न्यायला फक्त भगवंतच असतो.  संकट आले की माणूस हवालदिल होतो, आणि परिस्थिती हाताबाहेर गेली की मग परमेश्वर आठवतो.

 

 

 

संसारात संकट येणारच.  पण त्यावेळी मग परमेश्वराला आठवण्यापेक्षा  संसारात असतानाच परमेश्वराचे नाव घ्यावं.  संसाराला रामनामाची जोड असावी.  म्हणजे मग संकट आलं तरी त्यातून माणूस सहजरित्या बाहेर पडेल, आणि त्याला खरं आनंद समाधान लाभेल.  जे की वरवरचं नसेल.  तात्पुरतं नसेल.  संसार सोडून तर चालणार नाहीये. तो नेटाने करायचा आहे.  फक्त त्याला रामनामाची जोड द्यावी, असं समर्थ सांगताहेत.

 

संसारासारख्या शत्रूवर मात करायची असेल तर नामस्मरण हाच एक उपाय आहे.  आपण नामस्मरणांत गुंतलो म्हणजे आपोआपच आपल्या संसाराच्या सुखदुःखातून आपण मोकळे होतो आणि आपलं लक्ष नामस्मरणात केंद्रित होतं.
यासाठी समर्थ सांगताहेत की, प्रत्येकाने पहाटेपासूनच रामनाम घ्यावे, जेणेकरून संसारासारखा महाभयंकर शत्रू नामोहरम होईल, आणि माणसाचे मन प्रपंचातून मोकळं होईल.  ज्याचा ओढा रामनामाकडे राहील, आणि त्याची वाटचाल मोक्षप्राप्तीकडे होईल.  जसं संत तुकोबारायांना संसारात कष्ट असून, त्यांच्याकडे काहीही नसताना, ते म्हणतात “आनंदाचे डोही आनंद तरंग” खऱ्या आनंदाचा डोहावर ते आनंदाने तरंगतात.
जय जय रघुवीर समर्थ 
प्रिया शेंडे 
मोबाईल 7020496590

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.