Moshi : तमाशा कला म्हणून वाईट नाही!” – सोपान खुडे

एमपीसी न्यूज – “तमाशाला बदनाम केले जात असले (Moshi) तरी तमाशा कला म्हणून वाईट नाही!” असे मत लोकसाहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवारी (दि.19) व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात संदीप तापकीर यांनी संमेलनाध्यक्ष सोपान खुडे यांच्याशी दीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून सुसंवाद साधला.

यावेळी सोपान खुडे म्हणाले की, “ज्या गावात अजूनही एकही वर्तमानपत्र येत नाही अशा अतिशय छोट्या गावात माझे बालपण व्यतीत झाले. ग्रामसेवा नाट्य मंडळाच्या माध्यमातून अगदी बालवयातच नाटकाचे संवाद माझ्याकडून लिहून घेतले जात असल्याने लेखनाची बीजे पेरली गेली. नकळत्या वयात ‘टाकीचे घाव’ हे मामासाहेब मोहोळ यांचे चरित्र वाचनात आले अन् मी खूप प्रभावित झालो.

त्याच काळात सत्यवान – सावित्री या विषयावर एक नाटक लिहिले. ‘गोधडी’ ही पहिली कविता लिहिली. पुढे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचल्यावर माझे लेखन सुमार दर्जाचे असल्याचे लक्षात आले आणि अण्णा भाऊ साठे यांच्यासारखे लेखन करायचा निश्चय मनाशी केला. पुढे शिक्षण झाल्यानंतर पुन्हा लेखनाचा प्रारंभ केला. आजपर्यंत वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील (Moshi) सुमारे तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

“घराशेजारी तमाशाचा फड असल्याने नकळत्या वयापासून तमाशा बघत बघत मी मोठा झालो. ‘रांगडी गंमत तमाशाची’ यासारखी सुमारे चार पुस्तके तमाशा या कलाप्रकारावर लिहून झाली आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करताना ‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील विनोद ‘ , ‘अण्णा भाऊंची लोकनाट्ये’ अशा वेगळ्या पठडीतील पुस्तकांचे लेखन केले.‌

Mahavitaran : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉटस् अॅपवर कळवा; महावितरणचे आवाहन

यावेळी वगनाट्य आणि लोकनाट्य हा दोन कलाप्रकारात मूलभूत फरक आहे, हे लक्षात आले. मनोरंजन आणि प्रबोधन हा दोन्हीमधला महत्त्वाचा फरक आहे. वगनाट्य हे अतार्किक असू शकते; तर लोकनाट्य हे वास्तव मांडते.

“‘गिरान’ , ‘काळोख’ , ‘येड्याची जत्रा’ , ‘आखाडबळी’ , ‘रंगनायिका’ , ‘गैराट’ या पुस्तकांचे वाचकांनी खूप चांगले स्वागत केले. ‘सम्राट अशोक’ (नाटक), ‘जागर’ (एकांकिका संग्रह) तसेच विनोदसम्राट काळू बाळू’ , ‘कथा दोन सोंगाड्यांची’ , ‘रंगबाजी’ , ‘बतावणी’ , ‘लावणी : रंग आणि रूप’ , ‘तमाशातील फार्स’ , ‘देवाची माणसं’ या पुस्तकांना रसिक आणि समीक्षक या दोघांची पसंती मिळाली आहे.

‘बरखा सातारकर’ , ‘नटले मी तुमच्यासाठी’ या चित्रपटांचे आणि ‘चांदा ते बांदा’ या मालिकेचे लेखन केले. ‘जोडी तुझी माझी’ , ‘सखाराम हवालदार’ , ‘बाईचा लळा दौलती खुळा’ ही वगनाट्ये प्रकाश इनामदार आणि जयमाला काळे यांनी सादर केली; तर आकाशवाणी पुणे केंद्रावरून पंचवीस नभोनाट्ये प्रसारित झाली आहेत.

“बावन्नखणी आणि संगीत बारी या विषयांवर अभ्यास सुरू असून भावी काळात त्यावर लेखन करण्याचा मनोदय आहे. निरा नदीपासून सुरू झालेला माझा जीवनप्रवास इंद्रायणी नदीच्या काठावर येऊन पोहोचला आहे!” अशी हृद्य भावना सोपान खुडे यांनी यावेळी व्यक्त केली.

मुलाखतीनंतर संदीप तापकीर लिखित ‘मालवणी मुलखातील इतिहासाचे पहारेकरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले’ या पुस्तकाचे प्रकाशन इतिहास अभ्यासक श्रीमंत रघुजीराजे आंग्रे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, दिग्विजय जेधे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, गणेश सस्ते या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.