Mumbai News : रिक्त पदांवर कार्यरत कंत्राटी वीज कामगारांना कमी न करण्याचे न्यायालयाचे आदेश

राज्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा

एमपीसी न्यूज: महावितरण कंपनीतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगार वर्षानुवर्षे काम करत आहेत. राज्यातील एकूण अशा 1896 कामगारांना खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत कामावरून कमी करू नये, असा आदेश वांद्रे औद्योगिक न्यायालयातील न्यायमूर्ती आर. एन. आंबटकर यांनी दिला आहे.

या आदेशाची प्रत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला मिळाली असून महावितरण कंपनी प्रशासनाला याचे पालन करणे क्रमप्राप्त आहे.

महावितरण कंपनीतील रिक्त पदांवर काम करणा-या कंत्राटी कामगारांना कंपनीत भरती झाल्यावर कामावरून कमी करण्यात येऊ नये, या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळेस वांद्रे औद्योगिक न्यायालयात अर्ज दाखल करून हा दिलासा मिळवावा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने संघटनेला दिल्या होत्या.

कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने मुंबईतील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. विजय वैद्य यांनी बाजू मांडली. अण्णाजी देसाई, सुभाष सावजी, शरद संत, निलेश खरात, सचिन मेंगाळे, उमेश आणेराव, राहुल बोडके, सागर पवार, रोहित कोनवळकर आणि अनेक कामगारांनी संघटनेला वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.