Mumbai : ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. गेली अनेक वर्षे ते मधुमेह आणि रक्तदाबाच्या आजारामुळे त्रस्त होते. ते सिनेसृष्टीत ‘बासू दा’ नावाने ओळखले जात.

आयएफटीडीएचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणा-या बासू चॅटर्जी यांनी छोटी सी बात, रजनीगंधा, बातों बातों में, एक रुका हुआ फैसला आणि चमेली की शादी अशा वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांचं दिग्दर्शन केलं.

सहजसोपा आणि त्याची रंजक हाताळणी हे त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होते. त्यांचे चित्रपट आपल्या दररोजच्या जीवनाशी खूप जवळचे असत.

अशोक पंडितांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘मला सांगताना अत्यंत दुःख होतंय की महान दिग्दर्शन बासू चटर्जी यांचे निधन झालं. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे. आम्हाला तुमची नेहमीच आठवण येईल.’

50  हून अधिक हिंदी आणि बंगाली सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या बासू यांनी रजनी आणि व्योमकेश बक्षी या मालिकांचंही दिग्दर्शन केलं. 70  च्या दशकात हृषीकेश मुखर्जी आणि बासू चॅटर्जी यांच्यात सर्वोत्तम सिनेमे कोण तयार करतं याची निकोप स्पर्धा असायची. त्यांच्यातील या स्पर्धेमुळे प्रेक्षकांना फार चांगले सिनेमे पाहायला मिळाले.

30  जानेवारी 1930  रोजी अजमेर येथे त्यांच्या जन्म झाला. ते असे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी कोलकात्याची छाप स्वतःवर न पडू देता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

चमेली की शादी आणि खट्टा मीठा हे सिनेमे त्याचंच एक उदाहरण आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रेमकथा साकारणं आणि फुलवणं यात बासू यांचा हात कोणीही पकडू शकत नव्हते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.