Pune : गावाच्या सेवेसाठी वकील महोदयांनी महिनाभर चालवली पिठाची गिरणी

For the service of the village, the lawyer ran a flour mill for a month

एमपीसी न्यूज – लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवांना परवानगी असली तरी कोरोनाच्या भीतीने अनेक सेवा पुरवठादार आपली सेवा पुरवीत नसल्याने, नागरिकांची गैरसोय होत होती . या पार्श्वभूमीवर मोहाट (ता .जावळी ) येथील पिठाची गिरणी चालू ठेवण्यासाठी पेशाने वकील असलेल्या अनिल देशमुख यांनी महिनाभर गावकऱ्यांना स्वतः पीठ दळून देऊन, भात कांडणी करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.

या सेवेबद्दल पुण्यातील जावळी तालुका मित्र मंडळ आणि शिवप्रदेश प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्यावतीने जब्बार पठाण, राजू नलवडे, संजय शेलार, विनोद पार्टे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

जावळीत पहिला करोनाचा रुग्ण निझरे येथे सापडला. त्यानंतर तालुक्यातील बहुतेक सर्व व्यवहार, कामकाज ठप्प झाले. लॉकडाउन असल्याने या भागातील अनेक व्यवहार बंद झाले. यातच येथील काही पिठाच्या गिरण्या, भात कांडप मशीन देखील बंद राहिल्याने नागरिकांना पीठ दळून मिळणे, भाताचे तांदूळ करून मिळणे अवघड होणार होते.

एकामागोमाग एक करोनाचा संसर्ग झाल्याने अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या अनेकांनी आपले व्यवसाय स्वतःहून बंद ठेवले. या भागात असणाऱ्या काही पिठाच्या गिरण्यादेखील बंद राहिल्या. त्यामुळे नागरिकांना आपले दळण दळण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती.

अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित पिठाची गिरणी आहे. अनिल यांच्या मातोश्री कांताबाई शंकर देशमुख यांनीही गिरणी चालवून गावकऱ्यांना दिलासा दिला . मोहाट पंचक्रोशीतील ही पहिली गिरणी असून 1960  च्या दशकापासून अविरत सेवा देत आहे.

देशमुख यांचे आजोबा संपतराव धनावडे पाटील यांनी भाताच्या पिकाचे उच्च्यांकी उत्पादन घेतल्याबाबत तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना प्रगतिशील शेतकरी म्हणून गौरविले गेले होते. या पार्श्वभूमीवर अँड. अनिल देशमुख आणि त्यांच्या मातोश्री कांताबाई यांच्या सेवेचे जावळीत कौतुक होत आहे.

नागरिकांची गैरसोय पाहता मूळचे मोहाट येथील रहिवासी असलेले साताऱ्यातील ॲड. देशमुख यांनी घरची गिरणी स्वतः चालू करून आपल्या पदाचा, व्यवसायाचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता सेवा दिल्याने नागरिकांनी त्यांचे कौतूक केले.

लॉकडाऊन काळात रोज 4  ते 5  तास गिरणी चालवून तसेच गिरणीबरोबर शेतीची कामे करून देशमुख यांनी नवा आदर्श ठेवला.

जावळी परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्याने अत्यावश्यक सेवांनादेखील निर्बंध आले होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.