Chinchwad : गजानन बाबर यांच्या जीवनचरित्रातून सर्वांना प्रेरणा मिळेल – शरद पवार

एमपीसी न्यूज – सातारा जिल्ह्यातल्या कीकवी  मधून पिंपरी चिंचवड (Chinchwad) मार्गे ‘संघर्षयात्री’ हा ग्रंथ दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. संघर्षयात्री हे या ग्रंथाला नाव अतिशय यथोचित आहे. गजानन बाबर यांनी प्रतिकूल परिस्थितीत काम केले. त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या पुस्तकातून सर्वांना प्रेरणा मिळेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभेचे प्रथम संसदरत्न खासदार गजानन बाबर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘संघर्षयात्री’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते चिंचवड येथे संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे, सचिन अहिर, महादेव बाबर, विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष सचिन भोसले, मदन भोसले, संजोग वाघेरे, गौतम चाबुकस्वार, प्रकाश बाबर, शारदा बाबर, योगेश बाबर, धीरज बाबर, अमित बाबर, सुरज बाबर, सुमित बाबर, राहुल कलाटे आदी उपस्थित होते.

संघर्ष यात्री प्रकाशन सोहळा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने गजानन बाबर यांच्या जीवनावर आधारित संघर्षयात्री हा सर्वांना प्रेरणा देणारा ग्रंथ पुढे आला आहे. बाबर यांनी शून्यातून पुढे येऊन काम केले. संकटात असलेल्यांना मदत केली. आमदार खासदार म्हणून काम करत असताना त्यांचा सहवास लाभला. त्यांनी लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. गजानन बाबर यांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत मी केंद्रात काम करत असताना माझ्या केबिनमध्ये त्या प्रश्नांसंदर्भात चर्चेसाठी जागा दिली. केवळ शेती करून चालणार नाही तर उद्योगही वाढले पाहिजेत, ही भूमिका गजानन बाबर यांनी घेतली. टेल्को सारखा कारखाना शहरात येण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली. पुढील काळात कारखानदारीचे विकेंद्रीकरण करून चाकण, शिक्रापूर, तळेगाव, जेजुरी, इंदापूर (Chinchwad) येथे कारखाने उभे राहिले असे सांगत शरद पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कच्या जन्माची कहाणी देखील सांगितली.

यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य माणसांमध्ये लढण्याची ताकद निर्माण केली. त्या ताकदीची माणसे निर्माण केली आणि निर्माण केलेल्या या माणसांचा विधायक कामासाठी वापर केला. बाळासाहेब ठाकरे हे राजकीय जीवनात विरोधक होते. मात्र त्या पलीकडे जाऊन ते आपले जिवाभावाचे मित्र होते असे सांगत सुप्रिया सुळे यांना पहिल्यांदा संसदेत जाण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी संमती दिली असल्याचे पवार यांनी सांगितले.

आता युद्धातही जिंकू आणि तहातही जिंकू – संजय राऊत

खासदार संजय राऊत म्हणाले, गजानन बाबर यांनी संघर्षाची यात्रा सुरू केली. सन 1972 पासून त्यांचा शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू झाला. आपण आज प्रत्येकजण संघर्षयात्रीच आहोत. महाराष्ट्राबद्दल नेहमी म्हटले जाते, आपण युद्धात जिंकतो आणि तहात हरतो. मात्र आता युद्धातही जिंकू आणि तहातही जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरंदरच्या तहावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, असे सांगत आताच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने भाजपला 40 – 40 आमदार दिले आहेत. त्यासह काँग्रेसने एक आमदार दिला आहे. पण आता आपण या 81 ऐवजी 181 जिंकून आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. तर शिवसेना उबाठा पक्षाला मशाल चिन्ह मिळाले आहे. आगामी काळात तुतारी आणि मशाल हेच महाराष्ट्राचे दिशादर्शक ठरणार आहेत. इतिहास नेहमी लढणाऱ्यांचा सांगितला जातो. पळकुट्यांचा नाही. असा घणाघात देखील राऊत यांनी विरोधकांवर केला.

गजानन बाबर यांच्यासारख्या निष्ठावंतांमुळे आज शिवसेना जिवंत

गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची पहिली शाखा काळभोर नगर येथे स्थापन केली. या शाखेला स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी भेट दिली होती. गजानन बाबर यांच्यासारख्या निष्ठावंतांमुळे आज शिवसेना जिवंत आहे. वाकणारा, झुकणारा आणि विकणारा कधीही शिवसैनिक होऊ शकत नाही. बाळासाहेबांनी गजानन बाबर यांच्यासारखे शिवसैनिक तयार केले. महाराष्ट्राच्या वाट्याला कायम संघर्ष आला. जे जे हक्काचा आहे तेथे हिसकावले जात आहे. अशावेळी प्रत्येकाने संघर्ष यात्री म्हणून उभं राहिलं पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.

घेऊन तुतारी जाऊ दारोदारी – श्रीनिवास पाटील

ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, मोरया गोसावी यांच्यापासून अण्णासाहेब मगर, लांडे, वाघेरे, बाबर अशा शहरातील सर्वांचा नामोल्लेख आणि गुण वैशिष्ट्ये सांगत खासदार श्रीनिवास पाटील यांनी शहरातील अनेक आठवणींना उजाळा दिला. गजानन बाबर यांची ओळख केवळ एक किराणा दुकानदार एवढीच होती, पण त्यांनी कर्तुत्वावर आपली ओळख निर्माण केली असल्याचे ते म्हणाले. आपण सर्वजण आमच्या मागे उभा रहा, आपण नवीन इतिहास घडवू, असे सांगत त्यांनी ‘नाही वाकत हातात ताकद, घेऊन तुतारी जाऊ दारोदारी’ असा संकल्प देखील व्यक्त केला.

Pune: पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांना देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्तेच खूप झाले – संजय काकडे 

खासदार अमोल कोल्हे म्हणाले, गजानन बाबर यांच्याशी माझा सन 2009 साली संपर्क आला. माणसातला माणूस कसा असतो ते भाऊ यांच्यामुळे समजले. संसदरत्न पुरस्कार घेत असताना भाऊंची आठवण कायम येत असते. इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा सांगितला जातो, ज्यांनी दिल्लीच्या दरबारात बाणेदारपणा जपला होता. शिवरायांनी ताजमहाल, कुतुबमिनार उभा नाही केला तर महाराष्ट्राच्या मनामनात स्वाभिमान तयार केला. संघर्षयात्री हे पुस्तक सर्वांना मार्गदर्शक ठरेल.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले, राऊत साहेब मी तुमचा फॅन आहे. रोज सकाळी उठलं की फुल नडेश म्हणजे संजय राऊत साहेब… असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. भक्ती शक्ती शिल्प समूहाचे काम, आरोग्याच्या प्रश्नावर केलेले काम आणि शिक्षण संस्थांना शहरात आणण्यासाठी केलेले काम, सहकार, आयटी क्षेत्रात गजानन बाबर यांच्यासोबत केलेल्या कामाबाबत लांडे यांनी आठवणी मांडल्या. पुरंदरचा तह करताना शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले. पण त्यानंतर नव्या जोमाने स्वराज्य स्थापन केले, असे म्हणत त्यांनी आताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाबदल भाष्य केले.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले, गजानन बाबर यांच्यामुळे मला महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते केवळ विरोधासाठी विरोध करत नव्हते ते जनहितासाठी जे आवश्यक आहे त्याच्या ध्यास घेऊन त्यांची मांडणी असायची. निगडी येथील भक्ती शक्ती शिल्प करण्याचे त्यांचे स्वप्न होते, ते पूर्ण देखील झाले याचा आनंद आहे.”

 

योगेश बाबर यांनी प्रास्ताविक केले. पुस्तकाचे लेखन तानाजी गोरे यांनी केले. मोहन बाबर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.