Pimpri : शहरातील नद्यांना समृद्ध करण्यासाठी विविध संस्थांच्या वतीने नदी महोत्सव

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून आणि परिसरातून वाहणा-या नद्या मरणासन्न झाल्या आहेत. त्यांना पुन्हा उर्जितावस्था मिळावी. पुन्हा नद्यांचे वैभव खुलावे यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरातील 19 नदीप्रेमी संस्था एकत्र आल्या आहेत. या संस्था नद्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढून त्यांना पुन्हा समृद्ध करण्यासाठी भारतीय नदी दिवसानिमित्त मुठाई महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नदी महोत्सव साजरा करणार आहेत.

रविवार (दि. 25) पासून मुठाई महोत्सवाला सुरु होणार आहे. या दिवशी मुठा नदीवरील विठ्ठलवाडी घाट, एस एम जोशी पुलाजवळील घाट, मुळा नदीवरील गणेश घाट औंध आणि नवीन बाणेर लिंक रोडवरील घाटावर स्वच्छता अभियान राबवून अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. सोमवार (दि. 26) रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत नदी विषयावर चित्रकला, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

मंगळवार (दि. 27) आणि बुधवार (दि. 28) रोजी मुठा नदीजवळ सिद्धेश्वर घाटाजवळ प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. तसेच पवना नदीवर महाआरती करण्यात येणार आहे. रविवार (दि. 2 डिसेंबर) रोजी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे तीन हजार सायकलस्वार सहभाग घेणार आहेत. मंगळवार (दि. 11 डिसेंबर) रोजी औंध येथील पु ना गाडगीळ आर्ट गॅलरी येथे नदी विषयावरील चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

पुण्यामध्ये जीवितनदी या संस्थेने 2015 पासून भारतीय नदी दिवस ‘मुठाई महोत्सव’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. यानिमित्ताने नदीपरिसरात विविध कार्यक्रम घेऊन नागरिकांना नदी आणि नदीच्या प्रश्नविषयी जागृत करण्यात येत आहे. यातूनच शहर परिसरातील अनेक संस्था एकत्रित आल्या. त्यातून नदीला प्रदूषणमुक्त करण्यात येत आहे. या संस्थांनी 2020 सालापर्यंत घनकचरामुक्त नद्या आणि 2025 सालापर्यंत विषद्रव्यमुक्त नद्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यावर्षीच्या भारतीय नदी दिवसादिवशी महापालिका प्रशासनाला नदीच्या विविध समस्यांविषयी पत्र देण्यात येणार आहे. संस्थांच्या वतीने महापालिका प्रशासन आणि शहरातील नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.