NCP : उद्घाटनापूर्वीच शरद पवार गटाचे काळेवाडीतील पक्ष कार्यालय बंद !

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झालेले (NCP)उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात शरद पवार गटाने थाटलेले पक्ष कार्यालय उद्घाटनापूर्वीच बंद करावे लागले. पक्षातील गटबाजीतून कार्यालय बंद करावे लागले असून आता पिंपरी परिसरात कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

2 जुलै रोजी अजित पवार हे समर्थक(NCP) आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजितदादा सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील संपूर्ण पक्ष संघटना त्यांच्यासोबत गेली. राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय खराळवाडीत आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, अनेक माजी नगरसेवकांनी अजितदादांना साथ दिली. त्यामुळे खराळवाडीतील कार्यालयही अजित पवार गटाकडे राहिले आहे.

Pune : भटक्या-विमुक्त समाजाची अवस्था भीषण -गिरीश प्रभुणे

शरद पवार गटाला पिंपरी-चिंचवडमध्ये पक्ष कार्यालय नव्हते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे काळेवाडीत कार्यालय उभारण्यात आले होते. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शरद पवार यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे नियोजन केले. पण, काळेवाडीतील कार्यालय शहराध्यक्ष तुषार कामठे यांना पसंत पडले नाही. कार्यालयाचे प्रकरण थेट प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात पोहोचले होते. पिंपरी परिसरात जनसंपर्क कार्यालय असावे अशी भूमिका शहराध्यक्ष कामठे यांनी घेतली. त्यामुळे वर्गणी काढून थाटलेल्या कार्यालयाचे भाडे भरणे परवडत नसल्याने उद्घाटनापूर्वीच बंद करण्याची नामुष्की जुन्या कार्यकर्त्यांवर ओढवली.

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, शहरातील कार्यकर्त्यांना, नागरिकांना सोईस्कर होईल, यासाठी पक्ष कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी असणे गरजेचे आहे. त्यानुसार काळेवाडीतील कार्यालय बंद करून पिंपरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यालयाचे काम सुरू केले आहे. 19 नोव्हेंबरला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे.

युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, पक्ष कार्यालय चिंचवड विधानसभा मतदार संघ नको तर पिंपरी विधानसभा मतदार संघात असावे, असा काहींचा आग्रह होता. त्यामुळे काळेवाडीतील कार्यालय बंद केले आहे. तीन महिने कार्यालयाचे आम्ही भाडे भरले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.