New Delhi: केंद्रीय सचिवपदी संकेत भोंडवे यांना बढती

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या राजमार्ग विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेले सनदी अधिकारी संकेत भोंडवे यांना केंद्रीय सचिवपदी बढती मिळाली आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव म्हणून भोंडवे काम पाहणार आहेत.

संकेत भोंडवे हे 2007 च्या तुकडीचे ते आयएएस अधिकारी आहेत. समाजातील गरजू, उपेक्षित गटांसाठी सकारात्मक आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. मध्यप्रदेश येथील उज्जैन येथे जिल्हाधिकारी असताना उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरास दिव्यांगांसाठी केलेल्या आदर्श व्यवस्थेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भोंडवे यांचा सत्कार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संकेत भोंडवे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या 13 पुरस्कारांनी आजपर्यंत त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मध्यप्रदेश राज्यातील अशोकनगर, दतिया, होशंगाबाद, उज्जैन अशा विविध जिल्ह्यात भोंडवे यांनी जिल्हाधिकारी म्हणून वैशिष्ट्यपूर्ण काम केले आहे. संकेत भोंडवे हे पिंपरी-चिंचवडचे रहिवाशी असून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांचे ते चिरंजीव आहेत. संकेत यांच्या मातोश्री सुमन भोंडवे लेखिका, कवयित्री आहेत. त्यांना श्यामची आई पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.