Nigdi : राज्यातील महायुतीचे सर्वच्या सर्व 48 उमेदवार निवडून येणार – आदित्य ठाकरे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – मी महाराष्ट्रात फिरत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला, प्रचारफेरी, आदित्य संवादाला जात आहे. सगळीकडील वातावरणात भगवा रंगच दिसत आहे. धनुष्यबाण आणि कमळ दोनच चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती सगळीकडे विजयी होईल, याची मला खात्री असून राज्यातील महायुतीचे संपूर्ण 48 उमेदवार निवडून येणार आहेत, असा विश्वास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढत आज (मंगळवारी) दुपारी एक वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गो-हे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, माजी खासदार रामशेठ ठाकूर, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, उरणचे शिवसेना आमदार मनोहर भोईर, पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार, मावळचे भाजप आमदार तथा पुणे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे, आरपीआयएच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, उमा खापरे, अमित गोरखे उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मी महाराष्ट्रात फिरत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायला, प्रचारफेरी, आदित्य संवादाला जात आहे. सगळीकडील वातावरणात भगवा रंगच दिसत आहे. धनुष्यबाण आणि कमळ दोनच चिन्हे दिसत आहेत. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुती सगळीकचे विजयी होईल. याची मला खात्री आहे. वातावरण महायुतीच्या बाजूने आहे. आमचे विरोधक असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत”

“त्यांच्यासोबत असलेले जम्मू- काश्मीरमध्ये सांगतात 370 कलम आम्ही तसेच ठेवणार आहोत. त्यांची सत्ता आली तर अजून एक पंतप्रधान आपल्या देशात होईल, असेही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ही फाळणी लोकांना नको आहे. त्यामुळे लोकांनी शिवसेना-भाजप महायुतीला विजयी करायचे आहे. आम्ही जे विषय हाती घेतले आहेत. त्याबाबत मी बोलत आहे. समोरच्या विरोधकांबाबत बोलणार नाही. नक्कीच मला खात्री आहे की महाराष्ट्रातील 48 पैकी 48 उमेदवार महायुतीचे निवडून येतील”असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.