Nigdi News : सावरकर हे समाज क्रांतिकारक – सात्यकी सावरकर

एमपीसी न्यूज – ‘विनायक दामोदर सावरकर हे धर्मग्रंथप्रामाण्य न मानता समाजाचा रुढ पाया मोडून विज्ञानप्रामाण्य मानणारे समाज क्रांतिकारक होते’, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू आणि व्यासंगी अभ्यासक सात्यकी सावरकर यांनी केले.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांची सामाजिक क्रांती’ या विषयावर निगडी प्राधिकरण येथे शुक्रवारी (दि. 26) व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. गिरीश आफळे, नगरसेवक अमित गावडे, माजी महापौर आर.एस.कुमार, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, रविकांत कळंबकर, विश्वास करंदीकर, अनंत पिंपुडे आदी उपस्थित होते.

सात्यकी सावरकर म्हणाले, तात्याराव सावरकर यांनी धर्माची कठोर चिकित्सा करून त्यातील स्वर्ग, नरक इत्यादी व्यक्तिसापेक्ष तत्त्वज्ञान नाकारले. चातुर्वर्ण्य, पोथीनिष्ठ जातिभेद, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी अशा रूढ अंधश्रद्धा याविरुद्ध आपली लेखणी परजली. तसेच बुद्धिप्रामाण्यवाद जोपासत प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक समतेसाठी अनेक क्रांतिकारी उपक्रम राबविले असे त्यांनी नमूद केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष भास्कर रिकामे  म्हणाले,पिंपरी-चिंचवड शहरात अनेक सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्ती, अभ्यासू वक्ते, साहित्यिक आणि कलावंत आहेत. या सर्वांच्या प्रयत्नामुळे शहराची सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या प्रतिभावंतांना आपला कलाविष्कार सादर करण्यासाठी मुक्त व्यासपीठाची नितांत गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून या स्मारकाच्या व्यासपीठाचा वापर शहरातील प्रतिभावंतांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका ‘अ’ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनीत दाते, दीपक नलावडे, सुजीत गोरे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.