Pune : ओडिसी नृत्याविष्काराने रसिक भारावले

एमपीसी न्यूज – ओडिसी नृत्यशैलीची आकर्षक अदाकारी, भारावून टाकणारी देहबोली संकल्पनेवर आधारित नृत्याविष्कार याने रसिक भारावून गेले. ’६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या चौथ्या दिवसाचा उत्तरार्ध सुर, लय, ताल यांचा अनोखा मेळ साधत संपूर्ण संगीताची अनुभूती देणारा होता.

आजच्या दुसर्‍या सत्राची सुरुवात प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना रीला होता व त्यांचे सहनर्तक व नृत्यांगना यांच्या अप्रतिम नृत्याविष्काराने झाली. ‘द वेदाज’ ही वेदावर आधारित मुख्य संकल्पना घेऊन त्यांनी नवदुर्गा, पल्लवी व अथर्व वेदातील गृहस्थाश्रम या संकल्पनांवर सादरीकरण केले. नवदुर्गा या नृत्याविष्कारात राग भैरवीद्वारा देवीची नऊ वेगवेगळी रूपे सुदर्शन साहू व प्राप्ती गुप्ता यांनी साकारली. त्यानंतर राग रागेश्वरीमधील ‘पल्लवी’ प्राप्ती गुप्ता व भव्या अरोरा यांनी सादर केली. त्यानंतर रीला होता यांची निर्मिती असलेले व त्यांची आई व योग गुरु बिजोयलक्ष्मी होता रचना असलेले अथर्व वेदातील विवाहित जीवन (गृहस्थाश्रम) अत्यंत लीलया व शृंगारिकरीत्या त्यांनी साकारले. ज्यात स्त्री ही कुटुंबाचा आधार असते, तिच्यावरच कुटुंबाचे सुख व समाधान अवलंबून असते हे अतिशय मार्मिकरित्या दाखविले आहे. यात त्यांच्यासोबत सुदर्शन साहू यांनी सादरीकरण केले.

या रचनेसाठी पद्मविभूषण राजन, साजन मिश्रा, श्रीस्वरांश मिश्रा यांनी संगीत दिले आहे. या नृत्याविष्कारसाठी शास्त्रीय नृत्यांगना डॉ. पूर्वा शहा यांनी निवेदन केले. त्यानंतर जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी राग खेम-कल्याणने आपल्या गायनाची सुरुवात केली. यावेळी त्यांना ‘वत्सलाबाई जोशी’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याविषयी आभार मानत त्या म्हणाल्या, “पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ हा महोत्सव म्हणजे एक मोठे स्मारक आहे. अशीच जीवंत स्मारके उभी केली जावी. मी गुरूंचे कार्य असेच पुढे चालू ठेवावे अशीच प्रेरणा मला या पुरस्कारातून मिळते.” त्यांनी राग खेम कल्याण मध्ये ‘बालमवा…’ या पारंपरिक रचनेने सुरुवात केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील ‘पिहरवा मे कही दूर..’ ही बंदिश पेश केली. त्यानंतर राग नायकी कानडा मधील रूपक तालातील ‘मेरो पिया रसिया…’ व ‘निकसी अलबेली…’ या रचना पेश केल्या. त्यांनी पहाडी दादराने आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), विनोद लेले (तबला), धनश्री घैसास, स्वरांगी मराठे, ऋतुजा लाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

चौथ्या दिवसाचा समारोप जागतिक कीर्तीचे व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने झाला. त्यांनी राग कल्याणीमध्ये वर्णमने आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यांना तन्मय बोस (तबला), फालगू व गानमूर्ती (पखवाज), राधाकृष्ण (घट्टम), यज्ञेश रायकर (तानपुरा), सत्यसाई (मोरसिंग) यांनी साथसंगत केली.

कृष्णधवल प्रकाशचित्रांची अनोखी आर्टिस्ट रूम

६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यावर्षी खास तयार केलेली आर्टिस्ट रूम. संपूर्ण एसी आणि साउंडप्रूफ अशी ही आर्टिस्ट रूम असून यामध्ये अनेक कलाकारांची कृष्णधवल प्रकाशचित्रे लावण्यात आली आहेत. मंडपात स्टेजच्या मागील बाजूस ही खोली असून यामध्ये पं सवाई गंधर्व, उस्ताद अब्दुल करिम खान, माणिक वर्मा, माधव गुडी, हिराबाई बडोदेकर,पं बसवराज राजगुरू, केसरबाई केरकर यांच्या प्रकाशचित्रांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.