Pune : सवाई गंधर्व महोत्सवाचे दुपारचे सत्र गायन-वादनाच्या सूरांनी झंकारले

एमपीसी न्यूज – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक चंद्रशेखर वझे यांच्या गायनाने व प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांच्या सतार वादनाने सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सवाचे दुपारचे सत्र रंगले.

सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य व किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य चंद्रशेखर वझे यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाची सुरुवात केली. ‘अब तो करम करो…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. त्यानंतर ‘गोरे मुख सो मोरा मन भावे…’ ही रचना पेश केली. एकच बंदीश चार वेगवेगळ्या रागांत कशी पेश करता येईल, याचे अनोखे सादरीकरण त्यांनी केले. यात त्यांचे वडील पं. रघुनाथ वझे यांची ‘जा जा बदरवा जा…’ ही बंदीश त्यांनी राग दुर्गा, अभोगी, बिलसखानी तोडी, शंकरा या चार रागांमध्ये सादर केली.

_MPC_DIR_MPU_II

“माझ्या गुरूंचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांनी कधीच असा गाऊ नको म्हटले नाही. ते नेहमी म्हणत गाऊनच तुम्हाला काय योग्य ते बरोबर समजेल,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी पं. भीमसेन जोशी यांचा अभंग ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराज…’ सादर केला. ‘गोपाल मोरी करुणा क्यू नही आयी…’ या रचनेने त्यांनी मैफलीला विराम दिला. त्यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम), मनोज कट्टी, मंदार कुलकर्णी (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळा) यांनी साथसंगत केली.

पं. रवी शंकर यांचे शिष्य प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांनी राग सिद्धेन्द्र मध्यमाने आपल्या वादनाची सुरुवात केली. आलाप व मिंड ला टाळ्यांच्या कडकडाटात रसिकांनी दाद दिली. त्यानंतर राग टिळक कामोद व नट यांचे मिश्रण असलेला नवा राग त्यांनी पेश केला. त्यांना पं. विजय घाटे यांनी तबल्यावर साथसंगत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.