PCMC News : आयुक्तांच्या दुबई दौऱ्यास शिवसेनेचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह अधिकाऱ्यांच्या दुबई दौऱ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख (PCMC News) ॲड. सचिन भोसले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. महापालिकेच्या खर्चाने दौरे करून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याऐवजी लोकांच्या मूलभूत समस्यांकडे आयुक्त व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे ॲड. भोसले यांनी म्हटले आहे.

दुबईमध्ये विकसित करण्यात आलेल्या सिटी सेंटरच्या मॉडेलचा अभ्यास, त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासह तीन अधिकारी रविवार (दि.15) रोजी दुबईवारीसाठी रवाना होणार आहेत. त्यांचा हा दौरा शुक्रवार (दि.20) पर्यंत असणार आहे. दरम्यान, या दौ-याबाबत प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

या दौऱ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी विरोध दर्शवला आहे. महापालिकेच्या खर्चाने अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या दौऱ्यांना शिवसेनेने नेहमीच विरोध केला आहे असे सांगून ॲड. सचिन भोसले म्हणाले की, आता महापालिकेवर प्रशासनाची राजवट आहे. महापालिकेचा कारभार जबाबदारीने चालविणे अपेक्षित आहे. वास्तविक जनतेचे अनेक प्रश्न आहेत. नागरिकांना 24 तास पाणी देण्याची घोषणा महापालिकेने केली होती ती अद्याप पूर्णत्वास आलेली नाही.

ठिकठिकाणी विविध विकास कामांसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. कामेही पूर्ण होत नाही आणि रस्त्यांचीही वाट लागली आहे. कचरा कुंड्या काढून टाकण्याच्या धोरणामुळे शहराचीच कचरकुंडी झाली आहे मात्र याकडे  लक्ष द्यायला आयुक्त व अधिकाऱ्यांना वेळ नाही. (PCMC News) महापालिका आयुक्त आणि अधिकारी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहेत हे दुर्दैव आहे. यापुढे जनतेच्या पैशाने असे दौरे केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  ॲड. भोसले यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.