PCMC News : होर्डिंग नुतनीकरण करून घ्या, अन्यथा कारवाई; पालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील 1 हजार 341 होर्डिंग चालकांनी परवाना नुतनीकरणासाठी अर्ज केले आहेत. (PCMC News) मात्र, 212 होर्डिंग चालकांनी अद्याप होर्डिंग नुतनीकरण करण्यासाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे होर्डिंग चालकांनी त्वरीत नुतनीकरण करून घ्यावे, अन्यथा होर्डिंगवर कारवाई करून भंगारात विक्री केली जाईल, असा इशारा आकाश चिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी दिला आहे.

शहरात गेल्या काही वर्षांपासून होर्डिंगबाजीचे प्रमाण वाढले आहे. नेत्यांचे वाढदिवस, लग्न समारंभासह, जयंती, पुण्यतिथी, श्रध्दांजलीसह आदी कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात होर्डिंगबाजी करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामधील काही फलक हे अधिकृत असतात तर काही होर्डिंग अनधिकृत असतात. पालिकेचा आकाश चिन्ह परवाना विभागाकडून अनधिकृत होर्डिंगवर सातत्याने कारवाई करण्यात येत असते.

Pune Crime : प्रेमप्रकरणातून ‘त्या’ तरुणाचा खून? 2 महिलांसह सहा जणांवर गुन्हा दाखल

शहरात सध्या 1 हजार 812 होर्डिंग आहेत. यामधील 433 होर्डिंग होर्डिंगचा वाद न्यायालयात असून या होर्डिंगला जैसे थे ठेवण्याचे आदेश आहेत. 2022-23 या चालू आर्थिक वर्षांतील 1 एप्रिलपासून वसुली बंद होती. आता ती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 हजार 341 होर्डिंग चालकांकडे वसुलीसाठी मागणीपत्र पाठविले आहेत. मात्र, 212 होर्डिंग चालकांनी अद्याप होर्डिंग नुतनीकरण करण्यासाठी अर्ज केले नाहीत.

त्यामुळे होर्डिंग चालकांनी लवकरात-लवकर नुतनीकरणासाठी अर्ज करावेत. 31 मार्च पर्यंत अर्ज न केल्यास हे होर्डिंग काढून नियमाप्रमाणे भंगारात विक्री करून थकीत पैसे वसुल केली जातील, असा इशारा उपायुक्त ढोले यांनी दिला आहे. तसेच होर्डिंग चालकांनी आत्तापर्यंत 2 कोटी 84 लाख रूपयांचा भरणा केल्याचेही त्यांनी सांगितले. तर, शहराच्या विविध भागात औद्योगिक विकास महामंडळाचे 20 मोठे होर्डिंग आहेत. तर रेल्वे विभागाचे काही होर्डिंग आहेत. या होर्डिंगच्या वसुलीसाठी आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या वतीने मागणीपत्र पाठविण्यात येणार आहेत.

सध्या डिजीटल मार्केटींग, जाहिरातबाजीचे युग आहे. डिजीटल होर्डिंगमार्फत जाहिरात करण्यास अनेकजण प्राधान्य देत आहेत. तथापि, होर्डिंगचा व्यवसाय काही प्रमाणात कमी झाला आहे. (PCMC News) अनेक व्यवसायिक होर्डिंग परवाना हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे ज्यांना होर्डिंग परवाना हस्तांतरण करायचा आहे, अशा व्यावसायिकांनी आकाश चिन्ह व परवाना विभागाकडे अर्ज करावा, असे आवाहनही विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.