pimpri : मराठी कवयित्रींच्या कवितांची मेजवानी

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे आयोजन, 'पाणीदार माणूस पुरस्कार' प्रवीण लडकत यांना जाहीर

एमपीसी न्यूज : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी तर्फे जलपर्णी मुक्त सांडपाणी विरहीत पवनामाई अभियान उगम ते संगम हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘स्वरसायली प्रस्तुत वेचू शब्दरत्ने’ हा संत जनाबाई, बहीणाबाई चौधरी, इंदिरा संत, शांता शेळके तसेच त्यांच्या समकालीन कवयित्रीच्या रचना, किस्से आणि सुप्रसिध्द गाणी असा बहारदार संगीत कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत यंदापासून मानाचा पाणीदार माणूस पुरस्कार देण्यात येत आहे. पहिल्या वर्षीचा हा पुरस्कार पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभासाठी महापौर राहुल जाधव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रो.सुधिर मरळ, रो.अॅड. सोमनाथ हारपुडे, रो. युवराज वाल्हेकर, रो. सचिन काळभोर आदी उपस्थित होते.

शहरवासियांमध्ये नदीविषयी आस्था, आपुलकी राहावी. नदी प्रदुषणाबाबत जनजागृती व्हावी. जास्तीत जास्त नागरिकांनी नदीवर येऊन नदीची व्यथा समजून घ्यावी. यासाठी गायिका-अभिनेत्री झी मराठी सारेगमप फेम सायली राजहंस (स्वराज्य रक्षक मालिकेतील राजकुंवर भोसले शिर्के भुमिकेतील) आणि निवेदक सुप्रसिध्द अभिनेते शंतनु मोघे (स्वराज्य रक्षक मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज भुमिकेतील) व इतर कलाकार कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी (दि. 20 जानेवारी) सायंकाळी चार ते आठ या वेळेत जिजाऊ पर्यंटन उदयान, मोरया गोसावी मंदिर, चिंचवडगांव येथे पवना नदी किनारी होणार आहे. कार्यक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे.

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून ‘जलपर्णी मुक्त सांडपाणी विरहीत पवनामाई अभियान उगम ते संगम’ हे अभियान नोव्हेंबर 2017 पासून अविरत सुरु आहे. पवना नदीवर पवनानगर ते दापोडी या 62 किलोमीटरच्या पात्रावर जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. या कामात शहर परिसरातील 96 सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला आहे. दररोज 35 ते 40 मजूर प्रत्यक्ष नदीपात्रात जलपर्णी व कचरा काढण्याचे काम करतात. पात्रात असलेल्या अडथळयांमधील जलपर्णी काढून घाटापर्यंत आणण्याचे काम मजूर पाण्यात उतरुन करतात. प्रत्येक रविवारी सुमारे 250 ते 300 स्वयंसेवक सकाळी 8 ते 11 या वेळेत श्रमदानासाठी यांना मदत करतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील या अभियानात सहभाग घेत एका संस्थेमार्फत महापालिका हद्दीतील 24 किलोमीटर परिसरात काम सुरु केले आहे.

जलपर्णी नदीपात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचे कारण शहरातून येणारे मैलामिश्रित व कंपन्याचे रसायनमिश्रीत पाणी नदीत प्रक्रिया न करता मिसळले जाते. त्यामुळे मैलामिश्रित आणि रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, फुटलेले ड्रेनेज लाईन, चेंबर्स यावर योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक आहे. सर्व ड्रेनेज लाईन एसटीपी प्लांटला जोडून त्यावर जैविक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. आजवर या अभियानांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्यक्ष नदी घाटावर घेतले आहेत. दर महिन्याला नदीची साग्रसंगीत आरती केली जाते. मागीलवर्षी पवनामाई महोत्सव साजरा करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण

याच पार्श्वभूमीवर चिंचवडकरांसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने मोठी संगीत मेजवानी आयोजित करण्यात येत आहे. याचा सर्व रसिकांनी व निसर्गप्रेमींनी आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रमात उपस्थितांमधून लकी ड्रॉ काढून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. स्वच्छ आणि सुंदर पवनामाई सोबत सेल्फी काढण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. पवना नदीच्या काही चित्रांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.