Pimpri: शहरातील नागरिकांना महिन्याला सहा हजार लीटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत मिळणार; एक लाख कुटुंबांना फायदा


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्यात येणार आहे. याचा जवळपास एक लाख कुटुंबांना फायदा होईल. त्यासाठी केवळ 200 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल. 1 एप्रिल 2018  पासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा कमी वापर करणा-या नागरिकांना फायदा होणार आहे. नागरिकांनी पाण्याची काटकसर करावी. कमीत कमी पाण्याचा वापर करून मोफत पाणी देण्याच्या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी केले

महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून तो बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. समितीच्या अध्यक्षा सीमा सावऴे अध्यक्षस्थानी होत्या. या प्रस्तावावर सभेत चर्चा झाली. पाणीपट्टीवाढीसाठी प्रशासनाने प्रस्तावित केलेले दर जास्त असल्याच्या भावना समितीच्या इतर सदस्यांनी व्यक्त केल्या. परंतु, पाणीपुरवठ्यावर होणारा खर्च आणि त्यातून मिळणा-या उत्पन्नात मोठी तफावत असल्यामुळे दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे मत प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आले. त्यामुळे पाच टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. परंतु, पाच टक्के दरवाढ करण्याला शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे व राष्ट्रवादीचे राजू मिसाळ यांनी विरोध दर्शविला.

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी वार्षिक 109 कोटी रुपयांचा खर्च येतो. पवना नदीवर रावेत येथे बांधलेल्या धरणातून पाणी उचलणे, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करणे, त्यानंतर नागरिकांना पाणीपुरवठा करणे, मीटर रीडिंगनुसार पाण्याचे बिल  तयार करणे, त्याचे वाटप करणे या सर्व प्रक्रियेवर हा खर्च होतो. एकीकडे 109  कोटींचा खर्च होत असताना नागरिकांनी वार्षिक 34 कोटी रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, ही प्रशासनाची मागणी असते. परंतु, त्यातील अवघे 25 ते 26 कोटी रुपयांचीच वसुली होते. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर महापालिकेला वार्षिक 80 ते 85 कोटी रुपयांचा तोटा होतो, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी महापालिकेने नळजोडाला मीटर असलेल्या प्रति कुटुंबाला दरमहिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत द्यावी, अशी सूचना केली. त्याला समितीच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे 1 एप्रिल 2018  पासून प्रति कुटुंबाला दर महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत पुरवठा केला जाणार आहे.  स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयानुसार दर महिन्याला सहा हजार एक ते 15 हजार लिटर पाण्याचा वापर केल्यास प्रति एक हजार लिटरमागे आठ रुपये, 15 हजार एक ते 22 हजार 500 लिटरपर्यंत पाण्याचा वापर केल्यास प्रति एक हजार लिटरमागे साडेबारा रुपये, 22 हजार 501 ते 30 हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर केल्यास प्रति एक हजार लिटरमागे 20 रुपये आणि 30 हजार 1 लिटरच्या पुढे पाण्याचा वापर केल्यास प्रति हजार लिटरमागे 35 रुपये भरावे लागतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.