Pimpri : पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्जवाटप शनिवारपासून

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बाल कल्याण योजने अंर्तंगत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही जत्रा 4 ते 7 जानेवारी 2019 दरम्यान सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे. जत्रेतील स्टॉल घेण्यासाठी येत्या शनिवार (दि. 15) पासून अर्ज वाटप सुरु आहे. 24 डिसेंबर पर्यंत अर्ज जमा करण्याची मुदत आहे.

पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. तसेच यातून बचत गटांच्या उत्पादनांची माहिती शहरातील नागरिकांना होते. बचतगटातील महिलांना व्यवसाय, विक्री कौशल्ये, बाजार, व्यवहार या गोष्टी जवळून अनुभवता येतात. त्याच उद्देशातून ही जत्रा भरविण्यात येते. पवनाथडी जत्रे मध्ये महिला बचतगटांना वस्तू विक्रीकरिता स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. स्टॉलसाठी शनिवार (दि. 15) ते सोमवार (दि. 24) या कालावधीत कार्यालयीन वेळेत महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागात विहित नमुन्यातील अर्ज भरावे लागणार आहेत.

दिलेल्या मुदतीत बचत गटांनी अर्ज करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पवनाथडी जत्रेतील स्टॉल केवळ पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचत गटांना मिळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.