Pimpri: आझमभाईंना पुन्हा डावलले; समर्थकांमध्ये अस्वस्थता !

एमपीसी न्यूज – पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून दिलेल्या 11 जागांमध्ये डावलल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना महामंडळ दिले जाईल असे बोलले जात होते. परंतु, राज्य सरकारने शनिवारी (दि.31) रिक्त असलेल्या विकास महामंडळाच्या 21 जागांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये देखील आझमभाईंचा समावेश झाला नाही. त्यामुळे भाई समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून चलबिचल सुरु आहे. दरम्यान, भाई पुन्हा पक्षांतर करण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आझमभाई पानसरे पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते आहेत. पिंपरी मतदार संघात त्यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दोनवेळा शहराध्यपद भूषविले असून ते शहराचे महापौर देखील होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्षपद देऊन (राज्यमंत्री) लाल दिवा दिला होता. परंतु, त्यांचे त्यावर समाधान झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत काँग्रेमध्ये प्रवेश केला होता. विधानपरिषदेचा शब्द मिळाल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे बोलले गेले. परंतु, तिथेही त्यांचे मन रमले नाही. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले होते.

दोन वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिले. परंतु, त्यांनी ‘दादा’ नेतृत्वाशी जुळवून घेतले नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ्रेबुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझमभाई भाजपवासी झाले. सर्वप्रथम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी आणि नंतर भाजपचे झेंडा त्यांनी गळ्यात घातला. त्यांच्या प्रवेशामुळे शहरात भाजपची ताकद वाढली. पालिकेत भाजपची सत्ता आणण्यामध्ये पानसरे यांचा मोठा वाटा आहे. परंतु, भाजपात प्रवेश करुन दोन वर्षाच्या काळ लोटत आला तरी त्यांना कोणतेही पद दिले गेले नाही. पालिकेतील त्यांच्या समर्थकांनाही महत्वाचे पद दिले जात नाही. त्यामुळे भाई आणि भाईसमर्थकांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.

पावसाळी अधिवेशनात विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर 11 जागा निवडून दिल्या. त्यामध्ये पानसरे यांचा समावेश होईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, त्यावेळी त्यांना डावलण्यात आले होते. जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिवीर चापेकर स्मारकाच्या दुस-या टप्प्यातील कामाच्या भूमिपूजनासाठी शहरात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पानसरे समर्थकांनी भेट घेतली होती. भाईंना न्याय देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पानसरे यांना लवकरच न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिल्याचे पानसरे यांनी समर्थकांनी सांगितले होते.

त्यामुळे रिक्त असलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी आझम पानसरे यांची वर्णी लागेल असे बोलले जात होते. प्राधिकरण नाहीतर एखादे महामंडळ मिळेल, अशी चर्चा होती. परंतु, राज्य सरकारने शनिवारी (दि.31) नियुक्त्या केलेल्या महामंडळाच्या अध्यक्षांच्या नावामध्ये पानसरे यांचे नाव आले नाही. त्यामुळे पानसरे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. आता दोन वर्ष विधानपरिषदेची देखील निवडणूक नाही. महामंडळाच्या ब-यापैकी नियुक्त्या झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक 13 महिन्यावर आली आहे. त्यामुळे पानसरे यांना पदासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार असल्याची चिन्हे आहेत.

पानसरे यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही. मावळ लोकसभा मतदार संघात येणा-या पिंपरी विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड आहे. त्यांचे पाठिराखे मोठ्या संख्येने आहेत. पिंपरी मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून पानसरे ज्यांच्यासोबत तोच आमदार होतो, असा इतिहास आहे. त्यामुळे भाजपाला पिंपरी मतदार संघ ताब्यात घ्यायचा असेल तर भाईंची नाराजी परवडणारी नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.