Pimpri: डॉक्टरांनो, राजकारण न करता एकत्रितपणे कर्तव्य पार पाडा – आमदार महेश लांडगे

आमदार लांडगे, महापौर जाधव यांनी घेतला 'वायसीएमएच्‌'चा आढावा

एमपीसी न्यूज – डॉक्टरांमधील गटातटाच्या राजकारणामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाबाबत चांगले बोलले जात नाही. डॉक्टरांनी राजकारण न करता आपली जबाबदारी ओळखून एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे. रुग्णाला चांगले उपचार दिले जावेत. डॉक्टरांनी प्रामाणिक काम करताना जबाबदारी व कर्तव्य याच्या पलीकडे जाऊन सैनिक म्हणून काम केले पाहिजे. डॉक्टरांनी आपले कर्तव्य विसरता कामा नये. डॉक्टरांनी राजकारण न करता रुग्णसेवा करावी, असे निर्देश भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘वायसीएमएच्‌’ मधील डॉक्टरांना दिले आहेत. तसेच स्वाईन फ्ल्यू विभाग सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत.

महापालिकेचे वायसीएमएच् हॉस्पिटल, रुग्णालये व दवाखान्यांच्या कामकाजासंदर्भात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वायसीएमएच् येथील चाणक्य हॉल येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार लांडगे यांनी विविध सूचना दिल्या आहेत. बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका सुजाता पालांडे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, उपअधीक्षक डॉ.शंकर जाधव तसेच वायसीएमएच मधील डॉक्टर व परिचारिका उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “डॉक्टरांनी प्रामाणिक काम करताना जबाबदारी व कर्तव्य याच्या पलीकडे जाऊन सैनिक म्हणून काम केले पाहिजे. डॉक्टरांनी आपले कर्तव्य विसरता कामा नये. सीएमओ, वॉर्डमधील कर्मचारी यांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. गटातटाचे राजकरण न करता रुग्णाकडे लक्ष दिले पाहिजे. रुग्णाला ऑपरेशनसाठी तयार केले जाते. ऐनवेळी ऑपरेशन थिएटर उपलब्ध नसल्याने ऑपरेशन रद्द केले जाते”

मानधनावरील अनुभवी डॉक्टरांना मानधन तुटपुंजे असून 50 ते 60 हजार पगार दिला जातो. तोच खासगी दवाखान्यात दीड ते दोन लाख पगार दिला जातो. त्यामुळे अनुभवी डॉक्टर नोकरी सोडून दुसरीकडे जातात. गटातटाच्या राजकारणामुळे त्याचा त्रास पेशंटला होतो. त्यामुळे वायसीएम बद्दल चांगले बोलले जात नाही. पेशंटला चांगल्या सुविधा देण्यात याव्यात. प्रत्येक डॉक्टरांनी आपली जबाबदारी ओळखून पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, असेही लांडगे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आयटी क्षेत्रातील कंपन्या आहेत. त्या कंपन्यांची सीएसआरद्वारे मदत घेऊन हॉस्पिटलमध्ये विविध सुधारणा कराव्यात. पेशंटचा डॉक्टरांवर असलेल्या विश्वासामुळे डॉक्टरांनी पेशंट बरोबर सहानभूतीने वागल्यास पेशंटचा अर्धा आजार बरा होतो. स्वाईन फ्ल्यूने आजच दोन पेशंट दगावले आहेत. स्वाईन फ्ल्यु बाबत विशेष काळजी घेऊन उपाय योजना कराव्यात. स्वाईन फ्ल्यु विभाग सक्षम करावा. त्या ठिकाणी आवश्यक औषधे उपलब्ध करावीत, अशी सूचना लांडगे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.