Pimpri: ‘बीआरटीएस’च्या कार्यकारी अभियंत्याला मिळणार नवीन ‘मोटार’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्या दिमतीला असलेले वाहन जुने झाल्यामुळे वारंवार नादुरूस्त होत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे त्यांच्यासाठी नवीन मोटार खरेदी करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागामध्ये कार्यकारी अभियंता पदावर ज्ञानदेव रामचंद्र जुंधारे कार्यरत आहेत. त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी महापालिकेतर्फे वाहन (एमएच 14 पी 01416) सुविधा देण्यात आली होती. मात्र, हे वाहन वीस वर्षे जुने असून वारंवार नादुरूस्त होणे, चालू वाहनातून मध्येच धूर येणे आदी तक्रारी येवू लागल्या आहेत. त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले कामकाज सुरळीत होण्यासाठी त्यांना नवीन मोटार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जुंधारे यांना देण्यात आलेले वाहन निर्लाखित करावे आणि त्यांना नवीन वाहन खरेदी करण्यासाठी महापालिका कार्यशाळेचा अभिप्राय घेण्याबाबत स्थापत्य बीआरटीएस विभागाने प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार विद्यूत व यांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता यांनी जुंधारे यांना देण्यात आलेले वाहन कार्यमस्वरूपी बंद करून लिलावाने निर्लेखित करावे आणि नवीन वाहन खरेदी करण्याबाबत अभिप्राय दिला आहे. त्याला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. सहा लाखांच्या मर्यादेत राहून खातेप्रमुखांनी आपल्या खात्याला आवश्यक वाहने खरेदी करावीत, असे शासन निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यानुसार त्या किमतीच्या मर्यादेत राहून महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यासाठी होंडा कंपनीची होंडा अमेझ ही पेट्रोलवर चालणार नवीन मोटार खरेदी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.