Pimpri: सफाई कर्मचा-यांना स्वच्छतेचीच कामे द्या; अन्य कामे सोपविल्यास विभागप्रमुखांवर कारवाई

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सफाई कर्मचा-यांना केवळ सफाईचेच काम द्यावे. अन्य कोणतेही कार्यालयीन काम सोपवू नये, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यानंतरही सफाई कर्मचारी कार्यालयीन काम करत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर नियमाधिन कारवाई केली जाणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रात साफ सफाई करणे, स्वच्छता ठेवणे हे सफाई संवर्गातील कर्मचा-यांचे कर्तव्य आहे. परंतु, सफाई संवर्गातील अनेक कर्मचारी साफ सफाईच्या कामकाजाऐवजी विविध विभागातील कार्यालयात कार्यालयीन कामकाज करतात. त्यामुळे आरोग्य विभागातील साईटवर सफाई कर्मचा-यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, उपलब्ध सफाई कर्मचा-यांना अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे साफसफाईच्या कामात अडथळा निर्माण होत असून महापालिका हद्दीत अस्वच्छता पसरत आहे. त्यामुळे महापालिकेला स्वच्छ भारत अभियान राबविण्यात अडचणी येत आहेत.

त्यामुळे सफाई कर्मचा-यांना केवळ सफाईचेच काम देण्यात यावे. अन्य कोणतेही कार्यालयीन काम सोपवू नये. सफाई कर्मचारी कार्यालयीन काम करत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर नियमाधिन कारवाई केली जाईल, असा आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभाग घेतला आहे. त्याकरिता केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वेबसाईटवर 1250 गुणांचा समावेश असलेला अर्ज असून, तो महापालिका प्रशासाने भरला आहे. त्याअंतर्गत शहरातील सार्वजनिक, खासगी ठिकाणी, बस थांबा, रेल्वे स्थानक, व्यावसायिक ठिकाणे, झोपडपट्टया, भाजी मंडई अशा ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याकरिता केंद्र सरकारचे एक पथक महापालिका प्रशासनाने अर्जात नमूद केलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. याशिवाय महापालिकेचे मोबाईल ऍप डाऊनलोड केलेली संख्या देखील या सर्वेक्षणात विचारात घेतली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.