Pune : … हे गणराया, पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुद्धी दे ! काँग्रेस पक्षाचे पाणी आंदोलन

एमपीसी न्यूज – पुणे शहराला काही महिन्यापासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याच दरम्यान प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे शहराला पाणी द्यायचे झाल्यास पाणी कपात अटळ असल्याने शहराला हक्काचे 16 टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. या मागणीसाठी काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपती समोर भजन करीत … हे गणराया, पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुद्धी दे! अशी प्रार्थना गणरायाकडे करण्यात आली.
तसेच यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणेकरांना पाण्यात पाहू नका !  हक्काचे पाणी देऊन टाका !  जमत नसेल तर राजीनामा द्या …!  या आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी आमदार अनंत गाडगीळ, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, नगरसेविका सुजाता शेट्टी तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, पुणे शहरावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी कृत्रिम पाणी संकट आणले आहे. धरणात साठा असताना देखील नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही कसबा गणपती बाहेर आंदोलन करीत आहोत. जर अशीच परिस्थिती कायम राहील्यास आजच्या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा देखील त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.