Chakan : कंपनीत कामाला लावण्याचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – एका कंपनीत कामाला असताना अल्पवयीन मुलीला दुस-या कंपनीत कामाला लावण्याचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच मुलीचे अश्लील फोटो काढून घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना चाकण एमआयडीसी येथील डोंगरावर घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भाग्यवान शांताराम डांगले (वय 22, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी चाकण मध्ये एकाच कंपनीत कामाला होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली. आरोपीने पीडित मुलीला दुस-या कंपनीत कामाला लावण्याचे अमिष दाखवले. अभिजित पाटील हा मुलीला भेटण्यास येणार असून तोच दुस-या कंपनीत कामाला लावणार असल्याचे सांगून वाकी येथील एका हॉटेलमध्ये मुलीला बसवले. पीडित मुलीला हॉटेलमध्ये बसल्यानंतर पाणी प्यायला दिले. पाणी पिल्यानंतर मुलगी बेशुद्ध पडली. मुलगी बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपीने तिचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर एमआयडीसी मधील डोंगरावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. आरोपीने मुलीला स्पायसर चौक येथे आणून सोडले.

ही घटना 4 ते 9 डिसेंबर 2018 या कालावधीत घडली असून पीडित मुलीला नक्की वेळ माहिती नाही. घाबरलेल्या मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितला. घरच्यांच्या मदतीने तिने चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.