Pimpri : नदी स्वच्छता करून नगरसेवकाने केला वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – वाढदिवस म्हटलं की फलकबाजी, फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यात राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हटलं तर खूप मोठे कार्यकर्ते, डिजेचा कर्कश आवाज आणि बड्या नेत्यांची हजेरी असे समीकरण बनले आहे. मात्र, याला बगल देत भोसरीतील भाजपचे नगरसेवक सागर गवळी यांनी आपला वाढदिवस नदी स्वच्छता करत साजरा केला. दोन तास इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढून त्यांनी सामाजिक संदेश दिला आहे.

भाजप नगरसेवक सागर गवळी यांचा आज (बुधवारी) वाढदिवस आहे. अविरत श्रमदान संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या इंद्रायणी जलपर्णी मुक्त अभियानात गवळी यांनी सहभाग घेतला. दोन तास नदीतील जलपर्णी काढली. यावेळी आमदार महेश लांडगे,  कामगार नेते पै. सचिन लांडगे, दिगंबर जोशी, दिलीप जाधव, महेश गवळी, किशोर गवळी, आबासाहेब मसुर्डे , श्रीगणेश निसर्ग मित्र मंडळाचे कार्यकर्ते अभियानात सहभागी झाले होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ”इंद्रायणी नदी जलपर्णी मुक्त करण्याचे सुरु असलेले अभियान कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने या अभियानात आपला सहभाग नोंदविला पाहिजे. नगरसेवक सागर गवळी यांनी नदी स्वच्छता करत वाढदिवस साजरा केला, ही कौतुकाची बाब आहे. सर्वांनी इंद्रायणी जलपर्णी मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.