Pimpri : नौशाद शेख याला मागील वेळी राजकीय मदत मिळाली

नौशाद शेख याच्यावर कारवाईसाठी हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या

एमपीसी न्यूज – क्रिएटिव्ह अकॅडमी या निवासी शाळेचा संचालक नौशाद शेख याला अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार ( Pimpri )  केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने यापूर्वी अनेक विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मागील दहा वर्षांपूर्वी नौशाद शेखवर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्यावेळी त्याला राजकीय मदत मिळाल्याने तो कारागृहातून बाहेर आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नौशाद शेख याच्या विरोधात शहरातील हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या आहेत. नौशाद शेख याच्यावर कठोर कारवाई व्हावी तसेच यामध्ये कोणत्याही विद्यार्थिनींचे शैक्षणिक आणि इतर नुकसान होणार नाही याचे आश्वासन पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हिंदुत्ववादी संघटनांनी दिले. यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप, नितीन वाटकर, धनंजय गावडे, कुणाल साठे, संतोष गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले, नौशाद शेख प्रकरणात कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी कारवाई करावी. आरोपीला कठोर शासन झाले पाहिजे. पीडित विद्यार्थिनींचे समुपदेशन केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. मुलींच्या वसतिगृहात पुरुषांना राहता येत नाही. तरी देखील नौशाद शेख हा मुलींच्या वसतिगृहात राहत होता. मागील वेळी नौशाद शेख प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला. पण तो आता झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. अशा घटनांमुळे शहराचे नाव खराब होत आहे. आम्ही पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. सर्व शक्यता लक्षात घेत शेख याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली आहे.

Pune : विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी चौकशीसाठी समितीची नियुक्ती

अशा प्रकारे आता शिक्षण संस्था बंद झाल्यास दहावी बारावीत शिकणाऱ्या मुलींचे मोठे ( Pimpri ) शैक्षणिक नुकसान होऊ शकते. याबाबत बोलताना, आम्ही शिक्षण विभागाशी आणि शिक्षण मंत्र्यांशी बोलून त्या विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले.

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, यापूर्वी शेख याने अशा प्रकारचा गुन्हा केला होता. त्यावेळी त्याला राजकीय मदत मिळाली. पण यावेळी त्याला कठोर शासन व्हावे यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. आणखी काही मुली शेख याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. ती संस्थाच बंद करण्याबाबत पालिकेने कार्यवाही करावी. आणखी पीडित मुली असतील तर त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार करावी, आम्ही त्या पीडित मुलींना मदत करू. पालिका आणि पोलिसांनी मिळून शहरातील अशा काही संस्था आणि वसतिगृहे असतील तर त्या शोधून त्यावर कठोर कारवाई करावी. पालकांनी देखील मुलांच्या बाबतीत दक्ष राहावे.

आमदार उमा खापरे म्हणाल्या, “नौशाद शेख याने सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन क्रिएटिव्ह अकॅडमीच्या शाखा सुरू केल्या आहेत. त्यानुसार त्या शाखांवर देखील पोलिसांनी कारवाई करावी. असा प्रकार शहरात होत आहे, तो अतिशय वाईट आहे. मुलींच्या वसतिगृहात कोणताही पुरुष राहू शकत नाही, तरीही नौशाद शेख मुलींच्या वसतिगृहात राहत होता.

महिला आयोगाने या घटनेची अद्याप दखल का घेतली नाही, याबाबत बोलताना आमदार उमा खापरे म्हणाल्या. पोलीस तपास करीत आहेत. त्यांच्या तपासात हे तथ्य समोर येईल त्यानंतर याबाबत आम्ही महिला आयोगाकडे तक्रार करणार ( Pimpri ) आहोत.

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्याचा निषेध आहे. आमच्याकडे हा विषय आल्यानंतर आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला आतापर्यंत यश आले आहे. संबंधित शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याबाबत पालिका आयुक्त, शिक्षणाधिकारी यांना पत्र दिले आहे. याबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी भाजपने महिला ब्रिगेड तयार केली आहे. महिलांच्या बाबतीत कोणत्याही अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी महिला ब्रिगेड काम करणार आहे. शहरातील पीडित महिलांनी महिला ब्रिगेडशी संपर्क करावा.

सचिन बोधनी म्हणाले, नौशाद शेख हा बोलण्यात खूप तरबेज आहे. मराठवाड्यात जाऊन तो पालकांना विश्वास द्यायचा की, तुमच्या मुलांना चांगले गुण मिळतील याची तो खात्री देत असे. सायंकाळी क्लास झाल्यानंतर तो मुलींवर अत्याचार करत असे. मुलींनी नकार दिल्यास तिच्या कुटंबियांना सांगून तिची बदनामी करण्याची धमकी देत असे. त्याने मागील वर्षी सहा मुलींना परदेशात शिक्षणासाठी पाठवले आहे. संस्थेतील शिक्षिकेने शेख विरोधात आवाज उठवला असता त्याने शिक्षिकेला कामावरून काढून टाकले. मुलींना कमी गुण मिळाले तर मुलींना तो वेगळी कारणे सांगून त्यांना लैंगिक संबंध ठेवण्यास दबाव आणला जात असे. या गोष्टींना आता वाचा फुटली आहे.

नौशाद शेख प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी पोलिसांनी योग्य तपास केला आहे. पोलिसांनी विद्यार्थिनींचे समुपदेशन केले. अनेक विद्यार्थिनी तक्रार देण्यासाठी तयार झाल्या आहेत. सन 2014 ते 2024 या दहा वर्षांच्या कालावधीत अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संस्थेत शिकणाऱ्या मुलींचे ब्रेन वॉश करून धर्मांतरण, वेष्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे काही प्रकार झाले आहेत का, या शक्यतांचा तपास पोलीस करीत आहेत. शैक्षणिक संस्था सुरू करताना शासनाच्या विविध परवानग्या लागतात, त्या घेतल्या आहेत का याचाही तपास होणे आवश्यक आहे. पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळाला पाहिजे, असे नितीन वाटकर म्हणाले.

सन 2014 मध्ये याच आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी शहरातील काही संघटनांनी आंदोलन केले होते. त्यावेळी काही राजकीय मंडळींनी आरोपी नौशाद शेख याला मदत केली असल्याचा आरोप वाटकर यांनी ( Pimpri ) केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.