Pimpri: ‘स्मार्ट सिटी’तील विकास कामांसाठी जनता दरबार घेण्याची मागणी 

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळेसौदागर आणि पिंपळेगुरव परिसराचा विकास केला जात आहे. स्मार्ट सिटीतील कामे करताना नागरिकांच्या सूचना घेण्यात याव्यात. त्यासाठी जनता दरबार घ्यावेत. त्यातून येणा-या सूचनांचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये करावा, अशी मागणी चिंचवड विधानसभा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संदेशकुमार नवले यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नवले यांनी म्हटले आहे की, पिंपळेगुरव व पिंपळेसौदागर या दोन्ही गावांचा विकास 30 वर्षापूर्वीच झाला आहे. मात्र, स्मार्ट सिटीतून या दोन्ही गावांच्या विकासाच्या योजना कोणत्या आहेत. सध्या स्मार्ट सिटीमधून पिंपळेगुरव येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरु असून याच प्रकारची कामे पिंपळे सौदागर परिसरात कधी सुरु होणार? गावामध्ये अनेक सोसायटीमध्ये महापालिका 50 टक्के पाणी देते.

त्या सोसायटीमध्ये 100 टक्के पाणी कधी मिळणार? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. जनता दरबार घेवून या प्रश्‍नांची सोडवणूक करावी. स्मार्ट सिटीतून उद्याने विकसीत करावीत. तसेच पिंपळेसौदागर येथील अनेक रस्ते महापालिकेकडे हस्तांतरीत न झाल्याने रस्त्यांची दूरवस्था झालेली आहे. याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून हा प्रश्‍न देखील सोडवावा, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.