Pimpri : रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुबी हॉल क्लिनिकच्या चेअरमनवर गुन्हा दाखल करा – आमदार लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये गरीब रुग्णांवर उपचार करण्याचे टाळण्यासोबतच शासनाचीही आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आल्याचे सांगत याची गंभीर दखल घेऊन रुग्णालयाच्या अध्यक्षांवर आणि संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार जगताप यांनी धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक या धर्मादाय रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर शासनाच्या विविध आरोग्य योजनांखाली मोफत उपचारास नकार दिला जात आहे. किडनी ट्रान्सप्लान्टसाठी आलेल्या एका गरीब रुग्णाला रुग्णालयाने आधी उपचार खर्च भरण्यास सांगितले. तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे आल्यानंतर परतावा (रिफंड) देऊ, असे आमिष दाखविले. यासंदर्भात रुग्ण आणि रुग्णालयातील संबंधितांचे फोनवर झालेले सर्व संभाषण रेकॉर्ड झाले आहे.

त्यावरून रुबी हॉल क्लिनिकमध्ये गरीब रुग्णांवर उपचार करण्याचे टाळण्यासोबतच शासनाचीही आर्थिक फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन रुग्णालयाचे चेअरमन आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.