Pimpri : स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान आयुक्तांनी मुख्यालयातच रहावे 

नगरविकास विभागाचा आदेश 

एमपीसी न्यूज –  केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राज्यातील महापालिकांमधील स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू झाले असून 31 जानेवारी अखेर हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रशासन प्रमुख असलेल्या महापालिका आयुक्‍तांना मुख्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने काढला आहे. त्यामुळे या कालावधीत सर्वच महापालिका आयुक्‍त मुख्यालयात हजर असणार आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी “मशीन मोड’ पद्धतीने सुरू आहे. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांचे मूल्यमापन हे प्रत्यक्ष स्थळभेटींच्या आधारावर केले जाणार आहे. त्याअंतर्गत शहरातील सार्वजनिक, खासगी ठिकाणी, बस थांबा, रेल्वे स्थानक, व्यावसायिक ठिकाणे, झोपडपट्टया, भाजी मंडई अशा ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्र सरकारचे एक पथक महापालिका प्रशासनाने अर्जात नमूद केलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देणार आहे. महापालिकेचे मोबाईल ऍप डाऊनलोड केलेली संख्या देखील या सर्वेक्षणात विचारात घेतली जाणार आहे.

हे सर्वेक्षण करण्यासाठी पथक येणार असल्याने, महापालिकांनी सर्व या भेटीच्या कालावधीत परिपूर्ण तयारी करणे आवश्‍यक असल्याची सूचना देण्यात आली आहे. सर्वेक्षणाची पूर्वतयारी व सनियंत्रण योग्यरितीने होण्यासाठी या कालावधीत महापालिका आयुक्‍तांनी मुख्यालय सोडू नये. सर्वेक्षण मूल्यमापनातील महत्त्वाचा घटक असणारे, प्रत्यक्ष निरिक्षण व नागरिकांचे अभिप्राय या घटकांबाबत विशेषत्वाने उत्तम मूल्यांकन होण्याच्यादृष्टीने व्यक्‍तिश: आवश्‍यक खात्री करण्याच्या सूचना राज्याचा नगरविकास विभागाने दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.