Pimpri : जोश, उत्साह आणि तरुणाईच्या सप्तरंगात शहरात धुळवड साजरी

एमपीसी  न्यूज –  जोश, उत्साहात रंगलेल्या तरुणाईने रंगांची उधळण करत आजचा धुळवडीचा सण एन्जॉय केला. सप्तरंगाची उधळण यासोबतच  ‘होली खेले रुघुबिरा…’, ‘लुंगी डान्स…’, ‘रंग बरसे भिगे चुनरिया…’ अशा विविध गाण्यांवर नाचत रंगांत अक्षरशः न्हाऊन निघाली. शहरात विविध ठिकाणी केवळ तरूणाईच नाही तर एकत्रित येऊन जल्लोष केला. यात बालगोपालांसह ज्येष्ठांनीही धमाल केली. असे म्हणत धम्माल, मस्तीत गुरुवारी (ता. 21 ) धुलिवंदनाचा सण शहरवासीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला.

पिंपरी-चिंचवड शहरात आज धुळवडीनिमित्त तरुणाई सप्तरंगात न्हाऊन गेली. बुधवारी रात्री (ता. 22) होळीचा सण उत्साहात झाला. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळपासूनच शहरात धुलिवंदनाचे रंग खेळण्यासाठी आबालवृद्ध, गृहिणी, मित्रमैत्रिणी सकाळपासून रस्त्यावर उतरले.

पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर, प्राधिकरण, सिद्धिविनायक नगरी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, रावेत, अजमेरा कॉलनी, मासुळकर कॉलनी, अशा ठिकाणच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रंग उधळत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या छोट्या कंपनीसोबत मोठ्यांनीही ताल धरत रेन डान्स केला. सकाळपासून पिचकाऱ्यांद्वारे एकमेकांवर रंगांची उधळण करीत बालगोपाळांनी धुलिवंदनाचा आनंद लुटण्यास सुरवात केली. धुलिवंदन असल्याने आज सकाळपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण होते.

रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी कालपासून केलेल्या आयोजनाप्रमाणे अगदी सकाळपासूनच युवकांच्या धुळवडीला सुरवात झाली होती. शहरातील गल्ली, वस्त्यांमध्ये सामूहिक धुलिवंदनाचा आनंद घेतला गेला.काळेवाडी, आकुर्डी, निगडी भोसरी सारख्या परिसरात कुटुंब व मित्र परिवारासह घराच्या अंगणात धुळवड खेळण्यात आली. काही गृहरचना संस्थांमध्ये  छोट्या-पिशव्या व पिचकाऱ्यांनी रंग खेळले. शहरातील नाक्‍या-नाक्‍यावर समूहाने एकत्रित येत नागरिक एकमेकांवर रंग टाकले. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी  ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त होता. व्हॉट्‌सॲप, फेसबुक अशा सोशल मीडियावरून सकाळपासून सगळ्यांना सचित्र शुभेच्छा देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.