BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : काश्मीर समस्या चुकीच्या धोरणामुळे – सुजित कुलकर्णी

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- “काश्मीर समस्या ही तत्कालीन राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झाली. केवळ 370 वे कलम रद्द करून ही समस्या सुटणार नाही. नंतर त्यामध्ये घुसडलेले 35 अ हे कलम आधी रद्द करावे लागेल. व्यापक जनजागृती आणि काश्मीरमध्ये भारतीय विचारांचे सरकार स्थापन करणे, हाच काश्मीर समस्येवर मात करण्याची पहिली पायरी असेल ” असे स्पष्ट मत काश्मीर विषयाचे अभ्यासक सुजित कुलकर्णी यांनी मांडले. पुर्णानगर येथील शिवसाई व्याख्यानमालेत “जम्मू- काश्मीर आणि धारा 370” या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.

शिवसाई व्याख्यानमालेचे उदघाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश मोरे, व्याख्यानमाला समन्वय समितीचे कार्यवाह राजेंद्र घावटे, पांडुरंग पाटील, मनीषा पाटील, अरविंद वाडकर, श्रीकृष्ण काशीद आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सुजित कुलकर्णी म्हणाले, ” काश्मीर समस्या समजावून घ्यायची असेल तर, शतकानुशतके तिथे झालेली स्थित्यंतरे समजावून घेतली पाहिजेत. सम्राट अशोक, मौर्य साम्राज्य, मोगल, अफगाण आणि नंतर डोग्रा राजांनी काश्मीर वर राज्य केले. शेवटचा राजा हरिसिंह याने बहुसंख्य जनता मुस्लिम असूनही भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय उशिरा घेतल्यामुळे तसेच सामील नामा व्यवस्थित न झाल्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली. उलटपक्षी इतर देशांच्या दबावामुळे भारताला स्वतंत्र अस्तित्वाची मागणी मान्य करावी लागली. स्वतंत्र अधिकार असल्यामुळेच आज अतिरेकी कारवायांना उत आलेला आहे. पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद थैमान घालतो आहे. पण इतर भारतीय काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. ३७० कलमाद्वारे ही स्वायत्तता देण्यात आली आहे”

“आठ वर्षांनी समाविष्ट केलेल्या ३५ अ ला तर कुठलाही कायदेशीर आधार नाही. सर्वप्रथम 35 अ रद्द करावे लागेल. 370 कलम लगेच रद्द केल्यास त्याचे दुरगामी दुष्परिणाम होऊ शकतात. त्यासाठी काश्मिरात भारतीयत्व मान्य करणारे सरकार स्थापन करावे लागेल. स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी तेथील राजकीय पक्षांना आणि फुटीरतावादी नेत्यांना ते नको आहे. म्हणूनच ते जनतेला वेठीस धरत आहे. त्यामुळे काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकत नाही. तेथील जनतेला विकासाचे महत्व पटवून मनाने भारताबरोबर राहणे यातच हित आहे हे समजावून दिले पाहिजे. आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान आपले राजकीय हितसंबंध जपण्यासाठी काश्मीरचा वापर करत आहे. शिरोभागी असणारा काश्मीर मनाने भारतीयत्वाशी एकरूप होणे ही काळाची गरज आहे” असे सुजित कुलकर्णी म्हणाले.

शैलेश मोरे यांनी प्रास्ताविक केले. संयोजन प्रकाश कारंडे, आशिष पाटील, जाधव यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. आभारप्रदर्शन संतोष गायकवाड यांनी केले.

.

HB_POST_END_FTR-A1
.