Pimpri : नालेसफाईचे काम युद्धस्तरावर सुरु; बुधवारची ‘डेडलाईन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी महापालिकेचे नालेसाफसफाईचे काम युद्धस्तरावर सुरु असून काम पूर्ण करण्यास बुधवार (दि. 15) ची डेडलाईन दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात छोटे – मोठे मिळून 192 नाले आहेत. नाल्यांची लांबी सुमारे 100 किलोमीटर आहेत. महापालिकेच्या वतीने बांधलेल्या नाल्यांची (बांधीव नाले) वर्षभर साफसफाई केली जाते. उर्वरित नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर साफसफाई केली जाते. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे केली जातात. दरवर्षी मे महिन्यात साफसफाई केली जाते. परंतु, यंदा निवडणूक आचारसंहितेतही नाल्यांची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली.

नालेसफाई महिन्याभरापासून सुरु झाली असून त्याचे काम वेगात सुरु आहे. प्रत्येक प्रभागात त्याचे काम सुरु आहे. नाल्यात बेकादेशीरपणे सांडपाणी कोठून सोडले जाते, त्याची शोध मोहीम हाती घेतली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर महापालिकेचा भर राहणार आहे. महापालिका 230 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करत होती. आता त्यामध्ये वाढ झाली असून 250 ते 255 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. अडचणीच्या नाल्यांसाठी आम्ही पर्यायी व्यवस्था करत आहोत. मे अखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण केली जाणार असल्याचे प्रभारी आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

पावसाळ्यात शहरात पुरस्थिती अथवा एखादी दुर्घटना घडल्यास त्या ठिकाणी तातडीने मदत कार्य सुरू करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि तातडीने प्रतिसाद देण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या दुर्घटनेनंतर बाधितांना मदत देण्यात (निवास, तसेच जेवणाची सोय) करण्यासारख्या बाबीस उशीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका अधिका-यांनी अशा सुविधा देणा-या स्वयंसेवी संस्थांची यादी आधीच तयार करून आपत्तीजन्य स्थितीत त्यांना मदतीसाठी घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस, अतिक्रमण विभाग, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या मदतकार्य करण्याबाबतही चर्चा करण्यात आली, असल्याचे पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.