Pimpri : पावसाळी पाणी वापरात आणण्यासाठी उपाययोजना करा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील स्ट्रॉम वॉटर लाईन, ड्रेनेज लाईन याचे सर्वेक्षण करुन पावसाळी पाणी वापरात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी व मुळा नद्या वाहतात. या नद्यांना जाऊन मिळणारे अनेक लहान-मोठे नैसर्गिक नाले आहेत. परंतु, औद्योगिककरण आणि नागरिकरणाच्या रेट्याखाली शहरांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. हिच परिस्थिती राहिली तर येत्या काही वर्षात बहुतांश नैसर्गिक जलस्त्रोत नष्ट होतील. ते वेळीच रोखणे ही आपली व महापालिकेची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी रेन वॉटर हार्वेस्टींग आणि तत्सम उपक्रमांद्वारे जमीनित जिरवून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

प्रत्येक पावसाळ्यात शहरातील विविध रस्त्यांमधील स्ट्रॉम वॉटर लाईनद्वारे पाणी नाल्यात जाते. पुढे ते नदीत जाते. काही ठिकाणी स्ट्रॉम वॉटर लाईन बुजल्या गेल्या आहेत. त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थितरित्या होत नाही. तर कुठे स्ट्रॉम वॉटर लाईन ड्रेनेज लाईनला जोडल्या गेल्या आहेत. त्यातून पावसाळ्यात हे पाणी ड्रेनेज लाईनमध्ये जाते किंवा नाल्याद्वारे थेट नदीत जाऊन मिसळते. त्यामुळे ड्रेनेज लाईनचे सर्वेक्षण करुन पावसाळी पाणी वापरात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी वाघेरे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.