Pimpri News: सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी PMPML कडून  फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनजागृती

एमपीसी न्यूज – आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या वापरामुळे इंधन दरवाढ, वाहतूककोंडी आणि प्रदुषणावर चांगला उपाय ठरेल.  फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सार्वजनिक वाहतुकीबाबत जनजागृती व्हावी यासाठी पीएमपीएमएलचा अनोखा उपक्रम. या प्रदर्शनात पीएमपीएमएलचा  आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला असून बसची अनेक मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात  आलेल्या फिरत्या प्रदर्शनाचे महापालिका अधिकारी आणि कर्मचा-यांनी स्वागत केले आणि प्रदर्शन पाहिले. यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाने, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, विलास साळवी तसेच पीएमपीएमएलचे कर्मचारी विकास सुतार, महेश बिराजदार, ओंकार चितळे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. तसेच खासगी वाहनांच्या वाढत्या वापरामुळे अपुरी पार्किग व्यवस्था, वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ होत आहे. परिणामी, नकळतपणे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आपले शहर स्वच्छ ,सुंदर आणि पर्यावरणपूरक व्हावे यात नागरिकांचाही सहभाग महत्वाचा आहे. याच अनुषंगाने पीएमपीएमएलने फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या फिरत्या प्रदर्शनाचा शुभारंभ केला आहे.

या प्रदर्शनात पीएमपीएमएलचा  आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला असून बसची अनेक मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. तसेच बसमधील प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी सर्व सोयीसुविधा बसमध्ये करण्यात आली असून त्याबद्दलची माहिती याठिकाणी नागरिकांना भेटेल.  इंधनाला पर्याय म्हणून ई- बससुद्धा सुरु करण्यात आल्या आहेत. नागरिकांना अल्प दरात बसचा प्रवास करता यावा यासाठी विविध पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात शालेय विदयार्थी, ज्येष्ठ नागरिक, मनपा हद्दीतील प्रवास, दैनंदिन पास अशा निकषानुसार पासची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे फिरते प्रदर्शन जास्तीत जास्त नागरिकांनी पाहावे आणि पीएमपीएमएल आणि सार्वजनिक वाहतुकीचे फायदे याबद्दल माहिती घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा वापर करून आपले शहर पर्यावरणपूरक बनविण्यात आपले अनमोल योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.