Pimpri News: पोटनिवडणुकांची शक्यता मावळली, 4 प्रभागातील 4 जागा राहणार रिक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सहा महिन्यांवर येवून ठेपली असल्याने नगरसेवकांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या 4 जागी पोटनिवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे. पोटनिवडणुकांची शक्यता धूसर असून पोट निवडणुका जवळपास रद्दच झाल्यात जमा आहेत. त्यामुळे 4 प्रभागातील 4 जागा सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत रिक्तच राहतील.  

महापालिका प्रभाग एकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै 2020 रोजी, प्रभाग क्रमांक 14 चे राष्ट्रवादीचेच नगरसेवक जावेद शेख यांचे 31 जुलै रोजी आणि प्रभाग क्रमांक चारचे भाजप नगरसेवक लक्ष्मण उंडे यांचे 26 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाने निधन झाले. तर, प्रभाग क्रमांक 23 च्या भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचे 13 जुलै 21 रोजी निधन झाले. एखाद्या नगरसेवकाच्या निधनानंतर सहा महिन्यात पोटनिवडणूक व्हावी, अशी महापालिका अधिनियमात तरतूद आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेत असते.

साने, शेख, उंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तीन जागेवरील पोटनिवडणुकीची महापालिकेने तयारी केली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने पोटनिवडणुकीसाठीची प्रभानिहाय अंतिम मतदार यादी 3 मार्च 21 रोजी प्रसिद्ध केली होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पोटनिवडणुका पुढे ढकलल्या. नगरसेवकांच्या निधनामुळे जागा रिक्त होऊन एक वर्ष झाले.  मात्र, कोरोना महामारीमुळे या पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यास, राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाल्यावर पोटनिवडणूक घेतली जाते. सहा महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घेतली जात असते. परंतु, कोरोनामुळे सहा महिन्याच्या आतमध्ये निवडणूक घेता आली नाही. सार्वत्रिक निवडणूक सहा महिन्यांवर आली असल्यास पोटनिवडणूक घेतली जात नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 22 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानुसार निवडणुकीला केवळ सहा महिने शिल्लक आहेत. त्यामुळे चार जागेवरील पोटनिवडणूक होण्याची शक्यता आता मावळली आहे.

निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना म्हणाले, ”पोटनिवडणुकांबाबत कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे. पोटनिवडणुका जवळपास रद्दच झाल्यात जमा आहेत”.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.