Pimpri News: खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे रडीचा डाव – सचिन साठे

एमपीसी न्यूज –   देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरएसएसच्या दबावात येऊन या पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, असे जाहीर केले आहे. मेजर ध्यानचंद यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान वंदनीय आहे. परंतु, नेहरू-गांधी घराणे यांच्या नावाबाबत मनात तिरस्कारयुक्त भावना ठेवणाऱ्या आरएसएसचा दबाव देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रडीचा डाव खेळला आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सचिन साठे म्हणतात की, भाजप आणि आरएसएसला खेळाडूंविषयी खरोखरच आदर व्यक्त करायचा होता तर, त्यांनी आणखी दुसरा क्रीडा पुरस्कार जाहीर करायला हवा होता. राजीव गांधी यांचे नाव देशातील जनतेच्या मना मनात कोरलेले आहे. खेळरत्न पुरस्काराचे नाव बदलून राजीव गांधी यांचे बलिदान देशातील जनता विसरू शकत नाही. एखाद्या नावाविषयी किती पराकोटीचा द्वेष असू शकतो हेच मोदी यांच्या कृतीतून देशवासीयांना कळले आहे. भारतातील क्रीडा क्षेत्राची पायाभरणी काँग्रेसच्या काळात झाली. सध्या सुरू असणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत जे भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यातील बहुतांशी खेळाडूंचा सराव काँग्रेसच्या काळात उभारलेल्या स्टेडियममध्ये आणि क्रीडासंकुलात झालेला आहे. याचे भान सर्व देशभरातील क्रीडापटूंना आहे. आता पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच्या नावे उभारलेल्या स्टेडियमचे आणि केंद्रीयमंत्री अरुण जेटली यांचे नाव दिलेल्या स्टेडियमचे देखील नामांतर करून औदार्य दाखवावे.

केंद्र सरकार सर्वच पातळीवर अपयशी

मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे देशात बेरोजगारी, गुन्हेगारी, महागाई वाढली आहे. देशाचा जीडीपी खाली आला असून इंधन दर रोजच वाढत आहेत. याविषयी देशभरातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. याकडे दुर्लक्ष व्हावे, या कुटीलहेतूने भाजप सरकारने हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच आणि देशवासीयांचे लक्ष विचलित करण्यासाठी रडीचा डाव पंतप्रधान मोदी यांनी खेळला असल्याचे या कृतीतून दिसत आहे, अशीही टीका  साठे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.